विद्यार्थिनींनी आत्मनिर्भरतेकडे आपली वाटचाल करावी- कांचनमाला गावंडे:कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ
![]()
विद्यार्थिनींनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, तसेच मोबाईल व सोशल मीडियाचा वापर शैक्षणिक उद्देशांसाठी करावा, असे प्रतिपादन जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे यांनी केले. शहरातील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात नुकताच पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कांचनमाला गावंडे बोलत होत्या. या सोहळ्याला विद्यार्थिनी, पालक व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश चौखंडे होते, तर अतिथींमध्ये जिजामाता महिला मंडळाच्या उपाध्यक्षा रजनी टाले, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. गुलाब कळस्कर व अण्णा रेचे यांचीही उपस्थिती मंचावर लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. यावेळी एकूण ३२ स्नातक विद्यार्थिनींना, तसेच राज्यशास्त्र विषयातील २९ व गृहअर्थशास्त्र विषयातील ३ स्नातकोत्तर विद्यार्थिनींना पदव्या प्रदान करण्यात आल्या. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यशास्त्र विभागातील सर्व २९ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अविनाश चौखंडे यांनी विद्यार्थिनींना महाविद्यालयातील विविध शैक्षणिक सुविधांचा योग्य वापर करून यशस्वी होण्यासाठीचा ध्यास निरंतर ठेवावा. तसेच त्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन प्रा.डॉ.देवीलाल आठवले व प्रा.डॉ.हरिदास आखरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. के.ए. गावंडे, प्रा. अर्चना तिवारी, प्रा.डॉ.दिलीप मोरे, प्रा.डॉ.गजानन हेरोळे, प्रा.डॉ.शुभांगी इंगोले, प्रा.अनंत गावंडे, प्रा.डॉ. चंदा खंडारे तसेच इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच हा पदवी वितरण समारंभ प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला. विज्ञानवादी युगात संस्कृती, परंपरा विसरून चालणार नाही माणूसं शिक्षित होत आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर आपले कर्तुत्व सिद्ध करतोय. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. तसेच आधुनिक विज्ञानवादी यूगातील हा विद्यार्थी चिंतनशील आहे. त्याला जगासोबत जलद गतीने प्रवास करावयाचा आहे. असे असले तरी भारतीय संस्कूती व परंपरा विसरता कामा नये असे मत उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून याप्रसंगी मांडले. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थिनींमध्ये वाढला आत्मविश्वास पदवी घेतल्यानंतर विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास दिसून आला. भविष्यात काय करायचे, पुढे उच्च शिक्षण कुठे व कशाप्रकारे घ्यायचे याचाच त्या एकमेकींसोबत विचार विमर्श करीत होत्या.बहुतेकींनी आत्मनिर्भर होण्याचा विचार व्यक्त केला. कारण, स्वत:च्या पायावर उभे राहून वैयक्तिक क्षमतेचे मापन करण्यासोबतच कुटुंबालाही हातभार लावणे शक्य असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
