सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रूपाली चाकणकरांकडून धोका:अशोक खरातप्रकरणी बीडच्या व्यक्तीची SIT कडे तक्रार; राजकारणात खळबळ
![]()
राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला असून, हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलिस यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने थेट एसआयटीकडे धाव घेत ही तक्रार नोंदवली आहे. अशोक खरात प्रकरणाशी संबंधित तपास सुरू असतानाच या नव्या तक्रारीमुळे तपासाची दिशा अधिक गुंतागुंतीची बनली आहे. तक्रारदाराने केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि किती खोडसाळपणा आहे, याची सखोल चौकशी करण्याची जबाबदारी आता एसआयटीवर आहे. या प्रकरणात राजकीय हेतू असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात पीडितांकडून येणाऱ्या तक्रारींचा ओघ वाढतच चालला आहे. एसआयटीने यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू केली असून, या माध्यमातून दररोज अनेक तक्रारी नोंदवल्या जात आहेत. या तक्रारींमध्ये आर्थिक फसवणूक, महिलांचे शोषण यांसह कौटुंबिक वादांशी संबंधित मुद्देही समोर येत आहेत. या सर्व तक्रारींची सत्यता तपासणे हे तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान बनले आहे. अशोक खरात याच्याविरोधातील तपासही दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. स्वतःला दैवी शक्ती असल्याचे भासवून त्याने अनेकांना फसवले असल्याचे आरोप आहेत. विशेषतः धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या तक्रारींमुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. याशिवाय आर्थिक गैरव्यवहाराचेही अनेक धागेदोरे तपासात समोर येत आहेत. चौकशीदरम्यान अशोक खरात मानसिकदृष्ट्या खचल्याचेही समजते. मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे, असे वक्तव्य त्याने केल्याची माहिती आहे. त्याच्यावर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झाले असून, सध्या तिसऱ्या गुन्ह्याच्या चौकशीवर भर दिला जात आहे. फसवणुकीच्या एका गुन्ह्याची कबुली त्याने दिल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे, तर इतर गंभीर आरोपांची चौकशी सुरू आहे. प्रकरणात गुंतागुंत वाढण्याची शक्यता एकूणच, अशोक खरात प्रकरण आता केवळ एका गुन्ह्यापुरते मर्यादित राहिले नसून त्याला राजकीय आणि सामाजिक पैलूही प्राप्त झाले आहेत. नव्या तक्रारीमुळे या प्रकरणात आणखी गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. पुढील काळात एसआयटीच्या तपासातून कोणते नवे खुलासे समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
