छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला:पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅड ऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले
![]()
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी पायलकडून एक मोठी चूक झाल्याची घटना आज पुण्याच्या पुरंदर तालुक्यात घडली. पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले. या घटनेमुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पण भुजबळ हा प्रकार बाजूला सोडून आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या दिशेने पुढे निघून गेले. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री छगन भुजबळ या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. पण पायलटचा खानवडी गावातील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा समज झाला आणि त्याने त्या मैदानातच भुजबळांचे हेलिकॉप्टर उतरवले. या मैदानापासूनच काही अंतरावरच हेलिपॅड होते. हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरल्याचे पाहून तिथे हजर असलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. पोलिसांनी तत्काळ पायलटला योग्य ती माहिती दिली. त्यानंतर हेलिकॉप्टर तेथून हलवण्यात आले. तत्पूर्वी, भुजबळ कारने तेथून कार्यक्रमाच्या दिशेने निघून गेले. मोठा अपघात थोडक्यात टळला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पायलटच्या अशाच एका चुकीने विमान अपघातात बळी गेला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या बाबतीत हा प्रकार घटना घडल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. योग्य नियोजन असतानाही हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरवणे अत्यंत धोकादायक आहे. विशेषतः लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या अपघाताच कारणीभूत ठरली असती, अशी संतप्त भावना या प्रकरणी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आीहे. हेलिपॅड आकाशातून स्पष्ट दिसत होते का? पायलटकडून नेमकी कशी वा का झाली? काही तांत्रिक अडचण होती का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या प्रकरणी शोधली जाणार आहेत. दरम्यान, या घटनेमुळे व्हिआयपी लोकांची सुरक्षा व समन्वय या प्रकरणी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी या घटनेनंतर प्रशासन व्हिआयपी लोकांच्या दौऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क झाले आहे. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी हेलिपॅडची स्पष्ट चिन्हे, स्थानिक समन्वय आणि पायलटला अचूक मार्गदर्शन यावर भर देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तसेच, अजित पवार यांच्या भूतकाळातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची मागणीही जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा प्रकारच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा या प्रकरणी सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
