संभाजीनगर- जळगाव महामार्गालगत 35 किमीमध्ये 9 विहिरी धोकादायक:विहिरी भोवती झाडेझुडपे, कठडे नसल्याने सुरक्षेचा प्रश्न
![]()
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राज्य महामार्गावरील रस्त्यालगत अवघ्या पन्नास फूट अंतरावर कठडाही नसलेल्या धोकादायक विहिरी असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे रात्री-अपरात्री अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आळंद (ता. फुलंब्री) ते पाणस फाटा या ३५ किमी अंतरात ९ विहिरी धोकादायक स्थितीत आहेत. विशेष म्हणजे या विहिरींना झाडाझुडपांनी विळखा घातला आहे. त्यामुळे या विहिरी लक्षात येत नाहीत. संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात कार थेट विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला होता. यात अख्खे कुटुंब संपले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी प्रशासकीय यंत्रणेने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक या रस्त्याने येतात. अनेक खासगी वाहने या रस्त्यावरून धावत असल्याने हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो. पर्यटकांच्या वाहनांचीही मोठी वर्दळ असते. २३ जून २०११ रोजी एसटी बस सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. बनकीन्होळा गावच्या हद्दीत बस येताच ती रस्त्याच्या डाव्या बाजूच्या विहिरीत कोसळली होती. यात २३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. या घटनेची आजही आठवण काढली की गावकऱ्यांच्या अंगावर काटा येतो. यापासून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. ही बाब अधिक चिंताजनक आहे. Q. जळगाव मार्गालगत किती विहिरी धोकादायक आहेत? A. या विहिरींसंबंधित यंत्रणेला सोबत घेऊन पाहणी केली जाईल. तांत्रिक सर्वे करून अहवाल तयार केल्यानंतर विहिरींची संख्या कळेल. Q- आता उपाययोजना काय करणार? A. पाहणी केल्यानंतर संबंधित धोकादायक विहिरींचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल. त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. Q. अशा विहिरी पुन्हा तयार न होण्यासाठी काय करणार? A. यापुढील काळात राज्य महामार्गासह इतर रस्त्यालगत शेतकऱ्यांनी विहीर खोदू नये. यासाठी प्रतिबंध केला जाईल. डॉ. दिनेशकुमार कोल्हे, उपविभागीय पो. अ., सिल्लोड पानस फाट्याजवळ हॉटेल महालक्ष्मीसमोर रस्त्याच्या कडेला पन्नास फूट अंतरावरील विहीर अपघाताला निमंत्रण देत आहे. येथून एक किमी अंतरावर पुन्हा एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या शेजारी रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात विहीर आहे. सराटी- खंडाळा फाट्याजवळ रस्त्याच्या पूर्वेला धोकादायक विहीर आहे. अन्वी फाट्याच्या पूर्वी रस्त्याच्या डाव्या बाजूला पुलाजवळही एक विहीर आहे. पाहणीनंतर अहवाल बनवू
