फी भरुन 6 महिने:मोजणी न झाल्याने मंत्रालयाला धाडला कोरा चेक, लाचखोरीचे प्रकार आणि दिरंगाईला कंटाळून पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांचे प्रशासनाला पत्र
![]()
प्रतिनिधी | पंढरपूर शासकीय कार्यालयातील लाचखोरीचे प्रकार आणि दिरंगाईला कंटाळून एका संतप्त शेतकऱ्याने थेट महसूल मंत्रालयाला ‘कोरा चेक’ पाठवून उपरोधिक पत्र पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी आमदार कर्मवीर औदुंबरराव पाटील यांचे नातू आणि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला हे उपरोधिक पत्र धाडले. या तक्रारीतून महसूल विभागातील पारदर्शकता व कार्यसंस्कृतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अमरजीत पाटील यांची मोहोळ तालुक्यातील येवती येथे शेतजमीन आहे. या जमिनीच्या हद्दी निश्चित करण्यासाठी त्यांनी २७ सप्टेंबर २०२५ रोजी २४ हजार रुपये इतके ‘द्रुतगती’ शुल्क ऑनलाइन भरले होते. सरकारी नियमानुसार द्रुतगती मोजणी लवकर होणे अपेक्षित असताना, सहा महिने उलटूनही अद्याप मोजणी झालेली नाही. याउलट, त्यांच्या नंतर अर्ज केलेल्या अनेकांची कामे पूर्ण झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रात “भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय शुल्क भरूनही लाच दिल्याशिवाय अधिकारी हालचाल करत नाहीत. हे उघड गुपित आहे. जर मलई घेतल्याशिवाय काम होणारच नसेल, तर सरकारने अधिकृत दरपत्रकच जाहीर करावे आणि लाच घेणे हा कर्तव्याचा भाग असल्याचा कायदा करावा. ^येवती (ता.मोहोळ) येथील गट क्रमांक ५० च्या हद्दी खुणा निश्चिती करण्यासाठी द्रुतगती रक्कम भरून ६ महिने झाले तरी आजपर्यंत हद्द व खुणांची निश्चिती केलेली नाही. परंतु, जमीन मोजणीसाठी अर्ज केलेल्या इतरांच्या मोजणी झाल्या आहेत, असा आमच्या गावातील अनेक लोकांचा अनुभव आहे. अमरजीत पाटील, चेअरमन, पंढरपूर मर्चंटस को ऑप बँक.
