गुरूवर्य स्व.अंबादासपंत वैद्य मार्गाचे लोकार्पण:मंडळाच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
![]()
गुरूवर्य स्व.अंबादासपंत वैद्य यांनी सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी १९१४ मध्ये स्थापन केलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजही राष्ट्रहिताच्या विचारावर वाटचाल करीत आहे. गुरूवर्य स्व. अंबादासपंत वैद्य यांच्या कार्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी, या संस्थेतून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू निर्माण व्हावेत याकरता संस्थेच्या सर्वांगीण विकासाची नितांत गरज आहे.प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांचे समर्पित कार्य आणि व्यक्तीमत्व पाहता जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आद्य संस्थापक गुरूवर्य स्व. अंबादासपंत वैद्य यांच्या कार्याची प्रेरणा देणारे गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाच्या नामकरण फलकाचे लोकार्पण व कुस्ती मॅट वितरण, पूजन सोहळ्याचे आयोजन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे शुक्रवार १० रोजी सायं. ६ वाजता करण्यात आले. मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्याचे मुख्य उद्घाटक म्हणून पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते रस्त्याच्या नामकरण फलकाचे उद्घाटन व कुस्ती मॅटचे विधिवत पूजन करण्यात आले. पं.मिलींद कोरान्ने यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुजन सोहळा पार पडला. यावेळी एचव्हीपीएमच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर आ.तायडे, आ. राजेश वानखडे, अचलपूर नगराध्यक्ष रूपाली माथने, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, राजेश देशमुख, किरण पातुरकर, किरण महल्ले, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, नगरसेवक डॉ. संजय तीरथकर यांच्यासह गणमान्य उपस्थित होते. मंडळाला विकासाकरिता शासनाच्या मदतीची गरज प्रास्ताविकात मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक स्तरावरील वाटचाल, संस्थेच्या विकासाचे आव्हाने आणि एकमेव राष्ट्रीय गुरुकुल असलेल्या मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व प्रशासनाच्या मदतीची गरज व पुढाकार असल्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विजय पांडे व आशिष हटेकर यांनी केले. या सोहळ्याला मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग व सामाजिक क्षेत्रातील गणमान्यासह मंडळातील विद्यार्थी, खेळाडू हजर होते.
