घुईखेड येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात:श्री संत बेंडोजी महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजन
![]()
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे श्री संत बेंडोजी महाराज प्रकट दिनानिमित्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे शनिवार (दि.११) रोजी आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्री संत बेंडोजी महाराज संस्थान, ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत आहे. ११ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे महाआरोग्य रोग निदान शिबिर श्री संत बेंडोजी महाराज देवस्थान प्रांगण, घुईखेड येथे होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ञ डॉक्टरांकडून दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मेडिसिन विभाग, स्त्रीरोग व इतर निदान, नेत्ररोग तपासणी, अस्थिरोग विभाग, बालरोग विभाग, कान-नाक-घसा विभाग तसेच शल्य विभाग अशा सर्व विभागांतील तपासणी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला एका छताखाली मिळणार आहे. शिबिरामध्ये तपासणीसोबतच रुग्णांना आजारांबाबत योग्य मार्गदर्शन केले जाणार असून गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वितरण देखील करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना विशेष लाभ होणार असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. रविवारी महाप्रसाद घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराज संस्थान येथे पवित्र प्रकट दिन सोहळा सुरू असून यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन महोत्सव व श्री संत बेंडोजी महाराज भक्त महिमामृत ग्रंथ सामूहिक पारायण आदी धार्मिक उपक्रम होत आहे. अशातच शेवटच्या दिवशी रविवारी (दि.१२) कीर्तनानंतर दुपारी १ ते ५ वाजताच्या दरम्यान भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याचा सुद्धा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
