कन्नडला क्रीडा संकुलात भाजी मंडई:मोकाट जनावरे, डुकरांचा सुळसुळाट, कचऱ्यामुळे पसरली अस्वच्छता
![]()
येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये नगर परिषदेने कोरोना काळापासून सुरू केलेली भाजी मंडई अद्यापही सुरू असल्याने खेळाडूंमधून संताप व्यक्त केला जात आहे. तालुका क्रीडा संकुल कन्नड-चाळीसगाव रस्त्यावर आहे. कन्नड शहराच्या हृदयात २ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्रफळावर तालुका क्रीडा संकुल आहे. या ठिकाणी मल्टिपर्पज सभागृह, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदान, धावपट्टी, तसेच कुस्ती, व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी मैदानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. ग्रामीण भागातील खेळाडू निर्माण करणे, विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे शासकीय धोरण आहे. मात्र हे क्रीडा संकुल समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारातच भाजी मंडई बसल्याने अमूल्य क्रीडा संकूलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या क्रीडा संकुलासाठी तत्कालीन माजी आमदार किशोर पाटील, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. ^मी मुख्याधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालो आहे. क्रीडा संकुलाच्या आवारातील भाजी मंडईला पर्यायी जागा देण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ. क्रीडा संकुल अतिक्रमणमुक्त करण्यात येईल. क्रीडा संकुलालगतचे अतिक्रमण हटवण्यात येईल. -रवींद्र लांडे, मुख्याधिकारी, न.प. ^क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारात व आवारातील अतिक्रमण हटवण्यासाठी न.प.ला पत्रव्यवहार केला आहे. बैठकीत मल्टिपर्पज हॉल जीर्ण अवस्थेत असल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजला पत्र दिले आहे. -तुषार आहेर, तालुका क्रीडा अधिकारी क्रीडा संकुलाच्या आवारात भाजी मंडई भरल्याने क्रीडा संकुलाचा मुळ उद्देश संपला आहे. तसेच प्रवेशद्वारात शंभर टपऱ्यांचे अतिक्रमण झाले आहे. या ठिकाणी खेळाडूंसाठी होस्टेल उभारले तर अनेक खेळाडूंना राहण्याची संधी उपलब्ध होईल. राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा येथे होऊ शकतात. त्यासाठी अतिक्रमण हटवावे लागणार आहे. तालुक्यात आजपर्यंत तेजस्विनी बारवाल राज्यस्तरीय कुस्तीपटू निर्माण झाली, समृद्धी शिंदे सॉफ्टबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकली. सुनील वाघ यांनी व्हॉलीबॉलमध्ये राज्यस्तरीय यश मिळवले. आता संकुल मरणासन्न अवस्थेत आहे, अशी माहिती क्रीडा प्रशिक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली. भाजी मंडईमुळे मोकाट जनावरे, डुकरे यांचा सुळसुळाट आहे. उरलेला काडीकचरा येथे साचत असल्याने डास, घाणीचे साम्राज्य आहे. या ठिकाणी यापूर्वी राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धा, सायकल पोलिस स्पर्धा, विभागीय शिपाई, मार्शल आर्ट व दरवर्षी शासनाच्या वतीने दहा मैदानी खेळांच्या स्पर्धा होत होत्या, त्या आता थांबल्या आहेत. या ठिकाणी अविनाश काळे, प्रवीण शिंदे हे क्रीडा प्रशिक्षक नेमलेले आहेत. पर्यायी जागेसाठी निर्णय घेऊ पत्रव्यवहार केला, प्रतिसाद नाही
