धुळगावची दिव्या बनली पोलिस:आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असतानाही यशाला गवसणी
![]()
एकीकडे आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असताना आणि दुसरीकडे नातेवाईकांकडून विवाहासाठी होणारा दबाव झुगारून, धुळगाव (ता. येवला) येथील दिव्या बारहाते हीने पोलीस दलात झेप घेत आपले आणि वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही दिव्याने जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात नाशिक पोलिस दलात स्थान मिळवले आहे. दिव्याचे प्राथमिक शिक्षण धुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण नारायणराव पवार माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर तिने येवला येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने नाशिक येथील संघर्ष करिअर अॅकेडमीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, तयारी सुरू असतानाच गेल्या आठ महिन्यांपूर्वी तिच्या आजारी आईचे निधन झाले. या मोठ्या दुःखातून सावरत असतानाच नातेवाईकांकडून तिचे लग्न लावून देण्यासाठी वडिलांवर दबाव वाढू लागला. अशा परिस्थितीतही खचून न जाता दिव्याचे वडील तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. तिला तिचे काका सचिन बारहाते यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला.
