EPFO Pension Rule | नोकरदारांना 2 बायका असल्यास पेन्शन कोणाला मिळणार? जाणून घ्या नियम
EPFO Pension Rule | केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation) अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला निवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो. मात्र एखाद्या सदस्याच्या दोन पत्नी असल्यास पेन्शन कोणाला मिळते, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. EPFO च्या कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS-95) अंतर्गत यासाठी स्पष्ट नियम निश्चित करण्यात आले आहेत.
EPFO च्या नियमांनुसार पेन्शनचा लाभ देताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कायदेशीर वैधता. एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला पेन्शन देण्याचा अधिकार असतो. मात्र जर दोन पत्नी असल्याचा प्रश्न निर्माण झाला, तर कायद्याने वैध मानल्या गेलेल्या पत्नीला प्राधान्य दिले जाते. वारस म्हणून ज्याची कायदेशीर ओळख आहे, त्यालाच पेन्शनचा हक्क दिला जातो.
Hindu Marriage Act अंतर्गत पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर मानले जाते, जोपर्यंत पहिल्या पत्नीपासून कायदेशीर घटस्फोट घेतलेला नसतो किंवा तिचा मृत्यू झालेला नसतो. त्यामुळे पहिली पत्नी अस्तित्वात असताना दुसऱ्या पत्नीला कायदेशीर हक्क मिळत नाही. कर्मचाऱ्याने दुसऱ्या पत्नीला नामनिर्देशित केले असले तरीही पहिली पत्नी स्वतःला कायदेशीर वारस म्हणून पेन्शनवर दावा करू शकते. जर पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला किंवा कायदेशीर घटस्फोट झाला असेल, तर त्यानंतर दुसऱ्या पत्नीला पेन्शनचा लाभ मिळू शकतो.
EPFO Pension Rule | विशेष परिस्थितीत पेन्शनची वाटणी :
काही धार्मिक कायद्यांमध्ये एकापेक्षा जास्त विवाहाला परवानगी दिली जाते. उदाहरणार्थ Muslim Personal Law अंतर्गत काही परिस्थितीत एकापेक्षा अधिक पत्नी कायदेशीर मानल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर सर्व कायदेशीर पत्नींमध्ये पेन्शनची रक्कम समान प्रमाणात विभागली जाऊ शकते. तरीही सामान्यतः पहिल्या पत्नीला प्राथमिक हक्क दिला जातो.
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर जर दुसरी पत्नी नसल्यास पेन्शनचा लाभ कर्मचाऱ्यांच्या मुलांना दिला जातो. मुलांना ही रक्कम त्यांच्या वयाच्या 25 वर्षांपर्यंत मिळू शकते. तसेच EPFO कडून सदस्यांना e-Nomination प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो. या प्रक्रियेमुळे भविष्यात कुटुंबाला पेन्शन किंवा इतर लाभ मिळवताना अडचणी येत नाहीत. कुटुंबाच्या व्याख्येत प्रामुख्याने पत्नी आणि मुलांचा समावेश केला जातो. अविवाहित कर्मचारी आपल्या आई-वडिलांना देखील वारस म्हणून नामनिर्देशित करू शकतात.
