देशात वायू प्रदूषण आता केवळ मोठ्या शहरांची समस्या राहिलेली नाही. खेड्यांमधील हवादेखील तितकीच विषारी होत आहे. विश्लेषणानुसार, सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या २४ पैकी २२ राज्यांमध्ये शहरी भागातील प्रदूषण ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे. मात्र या दोन्हींमधील तफावत अत्यंत कमी आहे. पंजाब, राजस्थान, बिहार आणि गोवा या राज्यांत ही तफावत ५ टक्क्यांहूनही कमी आढळली आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागात पीएम २.५ ची वार्षिक पातळी राष्ट्रीय मानक ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरच्या वर आहे.

 

२०१४ ते २०२३ च्या आकडेवारीवर आधारित या अभ्यासात खेडी आणि शहरांतील हवेची तुलना करण्यात आली आहे. यात उद्योग, वाहने, बांधकाम, घरगुती इंधन व पऱ्हाटी जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे सांगितली. मुंबईतील सागरी वाऱ्यांचे नैसर्गिक सुरक्षा कवच कमकुवत झाले आहे. २१ ऑक्टोबर रोजी मुंबईचा वायू गुणवत्ता निर्देशांक १६५ होता. जागतिक यादीत मुंबई चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून नोंदवले गेले.

छोट्या शहरांत प्रदूषणाचे स्रोत अन् संनियंत्रण आवश्यक

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, कायमस्वरूपी सुधारणेसाठी वाहनांच्या उत्सर्जनावर नियंत्रण, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, स्वच्छ औद्योगिक तंत्रज्ञान, रस्त्यांची नियमित स्वच्छता व बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रण आवश्यक आहे. उघड्यावर कचरा व पऱ्हाटी जाळण्यावर कठोर कारवाई करण्यासोबतच ग्रामीण भागातही वायू गुणवत्तेची देखरेख वाढवावी लागेल. शहरे आणि आसपासच्या खेड्यांना एकत्र करून प्रादेशिक पातळीवर योजना आखाव्या लागतील.

 

अनेक लहान शहरांची हवा दिल्लीपेक्षाही प्रदूषित आहे

फिक्कीच्या २०२६ च्या अहवालानुसार अनेक छोट्या शहरांची हवा दिल्लीपेक्षाही जास्त प्रदूषित आहे. मेघालयमध्ये आसाम सीमेजवळ बर्नीहाट या औद्योगिक वसाहतीत पीएम २.५ ची पातळी १०१.१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली, तर दिल्लीत ती ९९.६ होती. दोन्ही ठिकाणी प्रदूषण राष्ट्रीय मानक ४० मायक्रोग्रॅमच्या अडीच पट आहे. सर्वाधिक प्रदूषित १० ठिकाणांपैकी जवळपास निम्मी ठिकाणे ही छोटी औद्योगिक केंद्रे किंवा महानगरांना लागून असलेली शहरे आहेत.

शहरांच्या सीमेबाहेर वाढतेय प्रदूषण, औद्योगिक घडामोडी हे मोठे कारण

अनेक शहरांच्या हवेतील निम्म्याहून अधिक पीएम २.५ हे आसपासची शहरे आणि इतर भागांतून येऊ शकते. याशिवाय वाहतूक, उद्योगांतून निघणारा धूर, रस्ते व बांधकामाची धूळ, घरगुती इंधन तसेच कचरा आणि जैव इंधन हे प्रदूषणाचे प्रमुख स्रोत असल्याचे सांगण्यात आले आहे. डिझेलच्या मालवाहू वाहनांमुळेही हवेतील सूक्ष्म कणांमध्ये वाढ होते..

मुंबईत यंदा मान्सून परतल्यानंतर गुजरात व उत्तर महाराष्ट्रावर अँटी-सायक्लोन निर्माण झाले. याने ऑक्टोबरमध्ये पूर्वेकडील वारे वाहत राहिले व समुद्राकडून येणारे थंड वारे उशिरा रात्रीपर्यंत कमकुवत राहिले. यामुळे सागरी वारे प्रदूषकांना विखरून शहराची हवा स्वच्छ करण्यात मदत करू शकले नाहीत. सागरी व जमिनीवरील वाऱ्यांच्या वेगाचा सूक्ष्म कणांच्या पातळीशी थेट संबंध असतो. सागरी वारे कमकुवत झाल्यावर पीएम २.५ वाढते.

 

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search