Hardik Pandya | 16 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा तुफानी खेळ! मुंबई इंडियन्स हादरली; पांड्यालाही करावं लागलं कौतुक, म्हणाला…
Hardik Pandya | आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सने (RR) मुंबई इंडियन्सचा (MI) २७ धावांनी पराभव करत आपला दबदबा कायम राखला आहे. गुवाहाटी येथे पावसामुळे प्रत्येकी ११ षटकांच्या करण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली. मात्र, या विजयाइतकीच चर्चा सध्या मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि राजस्थानचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी यांच्या भेटीची होत आहे.
वैभव सूर्यवंशीची बुमराहविरुद्ध ‘निडर’ फलंदाजी
सामन्यात सर्वांचे लक्ष जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि युवा वैभव सूर्यवंशी यांच्यातील लढतीकडे होते. मात्र, सूर्यवंशीने कोणतीही भीती न बाळगता बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सर्वांना थक्क केले.
सूर्यवंशीने केवळ १४ चेंडूंमध्ये ३९ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीत बुमराहला मारलेल्या दोन षटकारांचाही समावेश होता.वैभवच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राजस्थानने अवघ्या २.४ षटकांत ५० धावांचा टप्पा ओलांडला.
हार्दिक पांड्याने जिंकले चाहत्यांचे मन
मुंबईचा पराभव झाला असला तरी, हार्दिक पांड्याने खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवत वैभव सूर्यवंशीचे विशेष कौतुक केले. सामन्यानंतर हार्दिकने वैभवला मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.हार्दिक पांड्या म्हणाला: “१६-१७ वर्षांच्या मुलाला इतक्या निर्भयपणे खेळताना पाहणे आश्चर्यकारक आहे. त्याच्या फलंदाजीची शैली आणि आत्मविश्वास खरोखरच कौतुकास्पद आहे. मी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
सामन्याचा थोडक्यात आढावा
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ११ षटकांत १५० धावांचा डोंगर उभा केला. यशस्वी जैस्वालने ७७ धावांची नाबाद खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने ३९ धावांचे योगदान दिले. १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ १२३ धावांवर गारद झाला. नंद्रे बर्गर, संदीप शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मुंबई इंडियन्ससाठी हा हंगामातील सलग दुसरा पराभव असून, कर्णधार हार्दिक पांड्या आता संघ पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त करत आहे.
