वृंदावन येथील कथावाचक इंद्रदेव महाराज यांच्याविरोधात एका भक्त महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दिली असून, मीरा-भाईंदर येथील काशीमीरा पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कथावाचकाला तातडीने अटक करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे. तक्रारदार महिला गेल्या आठ महिन्यांपासून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, तिच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर देसाई यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६९, ७५, ७९ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, महिलेने समाजमाध्यमांवर कथावाचकाची प्रवचने पाहिल्यानंतर २०२३ मध्ये मुंबईतील एका सत्संग कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर ती वृंदावन येथील आश्रमातही गेली होती. पुढील काळात आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणी कथावाचकाला सांगितल्याचेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. आश्रमात बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील वर्तन केल्याचा आणि फोनवरून धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी देसाई यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. तक्रारदार महिलेसह कथावाचकाकडून कथित शोषण झाल्याचा आरोप करणाऱ्या अन्य काही महिलाही यावेळी उपस्थित होत्या त्यांनी आपले अनुभव यावेळी मांडले. धार्मिक प्रवचन आणि भक्तीच्या नावाखाली महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संबंधित कथावाचकाकडून कोणत्याही महिलेवर अन्याय झाला असल्यास तिने निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.या प्रकरणातील अन्य संभाव्य तक्रारदारांचे जबाब नोंदवून सर्व आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही भूमाता ब्रिगेडने केली आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search