बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार नाही; काँग्रेस लढणारच!:उमेदवार उभा करण्याचा निर्णय प्रदेश पातळीवरच- सतेज पाटील
![]()
बारामती पोटनिवडणुकीत भाजपने मध्यस्थी करून निवडणूक बिनविरोध करावी, अशी स्थिती काँग्रेस पक्षाची नाही, असे स्पष्ट मत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्ष मोठा असून, प्रदेश पातळीवरील नेत्यांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केला आहे. हा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचे समजते. काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांच्या प्रचारात प्रदेश स्तरावरील सर्वजण सहभागी होतील, असेही पाटील यांनी नमूद केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या “संघटन सृजन अभियान” बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक विनोद सुलतानपुरी (आमदार, हिमाचल प्रदेश), माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सतेज पाटील यांनी अभियानाबद्दल माहिती देताना सांगितले की, देशभरात हे अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारे लोकांचा जनमानस जाणून घेतला जात आहे. 17 ते 19 एप्रिल दरम्यान पुणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आढावा घेतला जाईल. सर्वसमावेशक पदाधिकाऱ्यांना पक्षाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे. हे अभियान सात ते आठ राज्यांमध्ये यशस्वी झाले असून, आता ते महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. पक्षाचे निरीक्षक विविध पदाधिकाऱ्यांना एकटे भेटून चर्चा करणार आहेत. नावे शिफारस करण्याबाबत त्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. ज्यांना आपली भूमिका मांडायची आहे, त्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर येऊन ती मांडावी, असे आवाहनही पाटील यांनी केले. यावेळी बोलताना विनोद सुलतानपुरी म्हणाले की, पुण्यातील विधी महाविद्यालयात माझे शिक्षण झाले असून, 20 वर्षांनी पुण्यात पुन्हा आल्याचा आनंद आहे. पुणे शहर ऐतिहासिक असून देशाला या शहराचे वेगळे महत्त्व आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी या अभियान माध्यमातून काम करण्यात येणार आहे.
