लव्ह जिहाद पीडित महिलांसाठी 'ऑपरेशन दुर्गा' अभियान सुरू:खासदार मेधा कुलकर्णी यांची घोषणा; समुपदेशन, पुनर्वसन केले जाणार
![]()
खासदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरलेल्या महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत समाजात जनजागृती करून पीडित महिलांना समुपदेशन, पुनर्वसन आणि आवश्यक मदत दिली जाईल. या अभियानासाठी लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या माध्यमातून पीडितांना त्वरित संपर्क साधता येईल. यावेळी त्यांनी सायली सुर्वे या महिलेच्या ‘घरवापसी’चे यश नमूद केले. सायलीचा पती आतिफ तासे याच्यावर 28 गुन्हे दाखल असून, त्याला तातडीने अटक करून सायलीला घटस्फोट मिळावा अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. सायलीवर मानसिक दडपण असून, तिच्या चार मुलांना आणि आई-वडिलांनाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले. सायली सुर्वेला ‘घरवापसी’नंतरही पोलीस संरक्षण मिळाले नाही, यावर कुलकर्णी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक पोलिसांनी वेळीच संरक्षण दिले असते तर तिच्या सासरच्यांनी तिला बळजबरीने परत नेले नसते, असे त्या म्हणाल्या. सायलीच्या मानसिक स्थितीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. सायलीने सासू गुलशन तासे हिच्या विरोधात दबावाखाली दिलेला जबाब पोलिसांनी ग्राह्य धरू नये, असेही कुलकर्णी यांनी म्हटले. गुलशन तासेवर अनेक गुन्हे दाखल असून, तिच्या चार सुना हिंदू आहेत आणि काहींनी सासूविरोधात तक्रारीही केल्या आहेत. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र ‘लव्ह जिहाद’ सेल स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र सरकारने बळजबरीने धर्म बदलण्यासाठी कोणावरही दबाव टाकला जाणार नाही, असा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
