पार्थ पवार हायफाय इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी:काँग्रेसवर टीका करताना त्यांना शब्द सूचला नसेल, आकाश मोरेंची खोचक टीका
![]()
राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू असल्याचा दावा करणाऱ्या खासदार पार्थ पवार यांच्यावर काँग्रेसचे बारामतीचे उमेदवार आकाश मोरे यांनी पलटवार केला आहे. पार्थ पवार हायफाय इंग्लिश मीडियममध्ये शिकलेत. त्यामुळे ते काँग्रेसवर टीका करताना मराठी शब्द न सूचल्यामुळे डाऊनफॉल म्हणाले असतील, असे ते म्हणालेत. आकाश मोरे यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना आव्हान दिले आहे. त्यांनी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बारामती निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच बारामतीची पोटनिवडणूक लढवल्यामुळे राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल होईल अशी टीका करणाऱ्या खासदार पार्थ पवार यांचाही समाचार घेतला. त्यांच्या या टीकेमुळे बारामतीच्या निवडणुकीत अधिकच रंग भरला आहे. पार्थ पवार हायफाय इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले आकाश मोरे म्हणाले, मी सेमी इंग्लिशमध्ये शिकलेला माणूस आहे. तरीही मला मराठीचे काही शब्द येत नाहीत. पण ते (पार्थ पवार) इंग्लिश मीडियम हायफायमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांना तेच म्हणायचे होते की, दम द्यायचा होता, काय करायचे होते हे मला माहिती नाही. पण मला असे वाटत आहे की, त्यांना मराठी शब्द सापडला नसेल. त्यामुळेच ते डाऊनफॉल म्हणाले असतील. काँग्रेस आपली भूमिका नेहमी मांडत असते. संविधान वाचवण्याची जबाबदारी एका माणसावर आली आहे. काँग्रेस ती जबाबदारी नेटाने पेलत आहे. आमच्या काँग्रेसचा एकेक कार्यकर्ता हजारांच्या बरोबर आहे. आमच्याकडे पैशाची बॅकिंग नाही की कसली पावरही नाही. अजित दादांविषयी एफआयआर नोंदवा, अर्ज मागे घेऊ ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आग्रही आहे. पण यासाठी काँग्रेसने काही अटी ठेवल्या आहेत. आमचे म्हणणे आहे की, राज्यातील भाजप प्रणित सरकारने अजितदादांचा घातपात आहे की अपघात आहे, याविषयी एफआयआर नोंदवावा. त्यांनी असे केले की आम्ही तत्काळ अर्ज मागे घेऊ. अन्यथा आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. अजितदादांना न्याय मिळावा, लोकशाही टिकावी, या राज्यातील सुसंस्कृत राजकारण पुनर्जीवित व्हावे अशी आमची इच्छा आहे. शरद पवार ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी सत्ताधारी व विरोधकांचा जसा समन्वय होता तो आता पूर्णः संपुष्टात आला आहे. असे राजकारण पुन्हा अस्तित्वात यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विधान भवनात चांगला भाषण करणारा विरोधी आमदार असेल तर सत्ताधारी आमदार त्याला पाठीवर थाप देऊन त्याचे कौतुक करायचा. पण आता हाणामारी होते. ही लोकशाहीची अधोगती आहे. ही अधोगती ज्या पद्धतीने झाली त्याविरोधात मी एक प्रतिक म्हणून ही निवडणूक लढवत आहे, असे आकाश मोरे म्हणाले. वरिष्ठ सांगतील ते करणार मी पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्ष, राहुल गांधी व हर्षवर्धन सपकाळ यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते जे काही आदेश देतील, त्याचे मी तंतोतंत पालन करेल. या सरकारने अजित पवारांच्या अपघाताविषयी काही सकारात्मक गोष्टी केल्या, चौकशी केली किंवा एफआयआर दाखल केला किंवा तसे संकेत दिसले तर आमच्या वरिष्ठांकडून जे सांगण्यात येईल, ते आम्ही करू, असेही आकाश मोरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
