चौकशीचा फास आवळताच अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला:आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार
![]()
नाशिकमध्ये अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अटकेनंतर सुरुवातीला पोलिसांशी उद्धटपणे वागणारा आणि त्यांनाच उलट शाप देण्याचा प्रयत्न करणारा खरात आता पूर्णपणे खचल्याचे चित्र दिसत आहे. तुम्ही पाप करत आहात, तुमच्यावर कोप होईल, अशा शब्दांत पोलिसांना घाबरवण्याचा प्रयत्न करणारा हा भोंदू बाबा आता कोठडीत शांत झाला असून, त्याचा सगळा आव उतरल्याची माहिती समोर आली आहे. अटक झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात अशोक खरात अतिशय आत्मविश्वासाने वागत होता. आपल्या मागे मोठे राजकीय पाठबळ असल्याचा त्याला विश्वास होता. त्यामुळे तो एसआयटी अधिकाऱ्यांशीही वाद घालत होता. मात्र, तपासाचा फास हळूहळू आवळला जाऊ लागल्यानंतर आणि सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास ढासळला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव होताच तो आता नरम पडला असून, दोन-तीन वेळा कोठडीत रडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, अशोक खरातला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने पुढील कारवाईसाठी ही सुनावणी होणार आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या 12 गुन्ह्यांपैकी एका प्रकरणात त्याला सात दिवसांची कोठडी देण्यात आली होती. एका पीडित महिलेसोबत अत्याचार करून तिला गर्भवती केल्यानंतर गर्भपात केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याची मागणी एसआयटीने केली आहे. तपासादरम्यान आणखी 11 महिलांनी पुढे येत खरातविरुद्ध तक्रारी नोंदवल्या आहेत. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी तो त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची भीती दाखवत असे. तुझ्या पतीला किंवा मुलाला काहीतरी होईल, असे सांगून तो मानसिक दबाव निर्माण करायचा. त्यानंतर धार्मिक विधी, ऊर्जा उपचार आणि शरीरशांतीच्या नावाखाली त्यांचे शारीरिक शोषण केल्याचे आरोप समोर आले आहेत. काही महिलांची मालमत्ता आणि जमीनही त्याने धमकावून बळकावल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. खरातच्या अडचणींमध्ये मोठी वाढ या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. हेल्पलाइनवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची काळजीपूर्वक छाननी केली जात असून, पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे. सध्या अशोक खरातविरुद्ध एकूण 12 गुन्हे दाखल असून, त्यामध्ये 8 महिला अत्याचार आणि 4 फसवणुकीचे गुन्हे आहेत. या सर्व प्रकरणांमुळे खरातच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली असून, त्याचं भवितव्य अधिकच कठीण होत चालल्याचं दिसून येत आहे.
