Gold Silver Rate Today | युद्ध थांबताच सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा आजचे लेटेस्ट रेट
Gold Silver Rate Today | गेल्या काही दिवसांपासून जागतिक शांततेला आव्हान देणारे अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यातील युद्ध अखेर तात्पुरत्या स्वरूपात थांबले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केल्याने आणि इराणच्या १० कलमी प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेतल्याने जागतिक बाजारपेठेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून, सोने-चांदीच्या दरांसोबतच शेअर बाजारातही (Share Market) मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ
इराण-अमेरिका शस्त्रसंधीच्या वृत्ताने बुधवारी स्थानिक बाजारपेठेत सोने (Gold) आणि चांदी (Silver) कमालीचे महागले आहेत. मंगळवारी जीएसटी (GST) वगळता सोन्याचा दर १,४७,५०० रुपये इतका होता, तो बुधवारी थेट ३,००० रुपयांच्या वाढीसह १,५१,५०० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, प्रति किलोमागे १०,००० रुपयांची भर पडली आहे. काल २,३७,००० रुपयांवर असलेली चांदी बुधवारी सकाळी २,४७,००० रुपयांवर पोहोचली आहे. युद्ध समाप्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याने आगामी काळात सुरक्षित गुंतवणुकीसाठी मौल्यवान धातूंच्या किमती आणखी वधारण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तवली आहे.
शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी; सेन्सेक्स २७०० अंकांनी वधारला
मंगळवारी रात्री इराणवर अणुबॉम्ब किंवा मोठा विध्वंसक हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात होती, ज्यामुळे जगभरातील भांडवली बाजारात भीतीचे वातावरण होते. मात्र, ट्रम्प यांनी घेतलेल्या ‘यू-टर्न’मुळे बुधवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे उधाण आले. प्री-ओपनिंग सत्रातच सेन्सेक्सने (Sensex) २,७०० हून अधिक अंकांची ऐतिहासिक झेप घेतली, तर निफ्टीने (Nifty) ७५० अंकांची जबरदस्त वाढ नोंदवली. विशेषतः आयटी (IT), मेटल (Metal) आणि रिअॅल्टी (Realty) क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून येत आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि क्षेत्रीय परिणाम
युद्धविराम आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याच्या शक्यतेने जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) भावात १३ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर ९५ डॉलर प्रति बॅरलवर आले असून, याचा फायदा हवाई वाहतूक आणि वाहतूक क्षेत्राला होताना दिसत आहे. शेअर बाजारात अदानी पोर्ट (Adani Port) आणि इंडिगो (IndiGo) यांसारख्या कंपन्यांच्या समभागात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. जागतिक तणाव निवळल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये एकाच दिवसात वधारले असून, बाजारात पुन्हा एकदा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
