भाजपचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची ग्वाही दिली. टप्पा अनुदान, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचे प्रश्न आणि जुनी पेन्शन या विषयांवर शिक्षकांना पुन्हा आंदोलन करावे लागू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बुधवारी सांगितले. मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात विजयाचा विश्वास व्यक्त करत गावडे यांनी शिक्षकांचे आभार मानले. वयावरून झालेल्या टीकेला कामातून उत्तर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कल गावडे यांच्या बाजूने स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिक्षकांनी दिलेला आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. “माझ्या वयावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आणि टीकाही केली. मी आजपर्यंत कोणत्याही टीकेला उत्तर दिलेले नाही आणि यापुढेही देणार नाही. माझ्या कामातूनच टीकेला उत्तर देईन,” असे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आपली असल्याचे गावडे म्हणाले. महायुतीच्या उमेदवारांना अपेक्षित यश न मिळाल्याबाबत ते म्हणाले, “पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव आणि मी खांद्याला खांदा लावून प्रचार केला. या पारंपरिक जागांवर विजय मिळवण्याचा विश्वास होता. मात्र, काही मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. हा कौल आम्ही मान्य करतो.” पराभवाचे दुःख असल्याचे सांगत त्यांनी संघटना पुन्हा मजबूत करण्याची आणि पुढील निवडणुकीत पदवीधर मतदारसंघाची जागा परत मिळवण्याची इच्छा व्यक्त केली. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत गावडे म्हणाले, “२००५ पूर्वीपासून विनाअनुदानित आणि टप्पा अनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या अनेक शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळालेला नाही. शिक्षकांनी मतपत्रिकांच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.” “मतदान केले किंवा नाही, यापेक्षा प्रत्येक शिक्षकाचा प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. शिक्षकांना त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी काम करणार आहे,” असेही त्यांनी सांगितले. दोन माजी आमदारांचा पराभव केल्याबाबत विचारले असता गावडे म्हणाले, “हा पराभव मी घडवून आणला, असे म्हणणार नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातील शिक्षक सुज्ञ आणि विचारवंत आहेत. या मतदारसंघाला समृद्ध शैक्षणिक वारसा लाभला आहे.” काम केले नाही, तर शिक्षक आपल्यालाही जागा दाखवतील, याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या आमदारांकडून झालेल्या चुका समजून घेऊन त्यांची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारासोबत झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीबाबत गावडे म्हणाले, “शिवसेनेने मला पाठिंबा दिला होता. उमेदवारानेही शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी चांगले काम केले आहे. या निवडणुकीत त्यांनी चांगली मते मिळवली. आता आम्ही दोघेही एकमेकांच्या साथीने शिक्षकांसाठी अधिक चांगले काम करू.”

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search