पुणे मनपा, पोलिस आयुक्तालयाची अंमली पदार्थ विरोधी मोहीम:सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले – जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी
![]()
पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने शहरात अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले की, अमली पदार्थांविरोधात समाजात व्यापक जनचळवळ उभारणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. या मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक २४ मधून करण्यात आली. यावेळी नगरसेवक देवेंद्र वडके, कल्पना बहिरट, उज्वला यादव, निलेश आल्हाट, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने आणि फरासखानाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहरात अमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाचे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहकार्याने अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यास मदत होईल, या पार्श्वभूमीवर ही विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. बिडकर पुढे म्हणाले की, अमली पदार्थांच्या विळख्यात अडकून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. वाढत्या ड्रग्सच्या वापराला आळा घालणे ही केवळ पोलिसांचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. कमी किमतीत अमली पदार्थ उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या गर्तेत ओढली जात आहे. अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास कारवाईसाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या उपक्रमामुळे शहरात व्यसनमुक्तीसाठी जनजागृती वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
