भारताकडे 65 दिवसांचा ऊर्जासाठा:ऊर्जा सुरक्षेसाठी प्रत्येक भारतीयांनी योगदान द्यावे, संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडीअर महाजनांचे आवाहन
![]()
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भारताकडे सध्या ६५ दिवस पुरेल इतका धोरणात्मक ऊर्जासाठा उपलब्ध आहे. संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडीअर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी ऊर्जा सुरक्षेच्या लढ्यात प्रत्येक भारतीयाने सजग राहून योगदान देण्याचे आवाहन केले आहे. ब्रिगेडीअर महाजन एरंडवणे परिसरातील सेवा भवन येथे आयोजित ‘भारत आणि मध्यपूर्व संघर्ष’ या विशेष व्याख्यानात बोलत होते. यावेळी तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ कल्याण कुलकर्णी, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष विद्याधर कुलकर्णी आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते. महाजन यांनी सांगितले की, जगाच्या तुलनेत भारत अधिक सुरक्षित स्थितीत आहे. देशाची तेल शुद्धीकरण क्षमता तिप्पट असून, भारत युरोपलाही शुद्ध तेलाची निर्यात करतो. गरज पडल्यास निर्यात थांबवून देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यांनी नागरिकांना ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. सध्या देशाला बाह्य संकटापेक्षा अंतर्गत दुष्प्रचार आणि अपप्रचाराचा धोका अधिक असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी ‘देश प्रथम’ ही भावना ठेवून अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. अमेरिकेच्या स्थितीवर बोलताना महाजन म्हणाले की, अमेरिका या युद्धातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहे, कारण त्यांची वायूसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर खर्ची पडली आहे. दुसरीकडे, इराणच्या सॅटलाईट गायडन्स आणि एअर डिफेन्स सिस्टीममध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. इस्रायल अत्यंत केंद्रित असून, हिजबुल्ला आणि हुतींचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी विक्षिप्त राज्यकर्त्यांशी कसे वागायचे, हे शिकणे आवश्यक असून, त्यासाठी अभ्यासक्रमात वेगाने बदल करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केले. यावेळी तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ कल्याण कुलकर्णी यांनी इराणच्या ऐतिहासिक वारशावर प्रकाश टाकला. इराणचा इतिहास लढाऊ वृत्तीचा असून, झोराष्ट्रीयन धर्म सनातन धर्मातून प्रभावित होता. इस्लामसोबतच्या लढाईतही त्यांनी सहजासहजी शरणागती पत्करली नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या मते, इराणची भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव खलिफांवरही राहिला आहे. इराणने नेहमीच योद्ध्यांची भूमिका बजावली आहे. या व्याख्यानाचे आयोजन व्हीएसके पुणे फाउंडेशन आणि प्रज्ञा प्रवाह यांच्या वतीने करण्यात आले होते.
