अमरावतीत 'स्वर ताल उत्सव' संगीत सोहळा पडला पार:विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजन
![]()
अमरावती येथील वैभव कॉलनी-दस्तूर नगर येथील कला वैभव संगीत अकॅडमीतर्फे ‘स्वर ताल उत्सव-२०२६’ या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फरशी स्टॉप येथील नरहरी मंगल कार्यालयात हा उत्सव पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, तसेच रंगमंचावर सादरीकरणासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरु आणि शिष्यांच्या अनेक जोड्यांसह बालकलाकार व ज्येष्ठ कलाकारांनी सहभाग घेतला. या संगीत महोत्सवात शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, व्हायोलिन, हार्मोनियम वादन आणि तबला वादन अशा विविध माध्यमांतून दर्जेदार कला सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी भक्तीरसावर आधारित सुमारे ३६ भक्ती रचना सादर केल्या. यावेळी महेश मूलचंदानी, डॉ. अमित वडुरकर आणि पुणे येथील मिलिंद दलाल हे अतिथी म्हणून उपस्थित होते. साथसंगत करणाऱ्या कलाकारांमध्ये हार्मोनियमवर डॉ. संदीप दलाल, कीबोर्डवर नागेश तायडे, तर तबल्यावर तारक दलाल, सर्वज्ञ दलाल, नंदन वसु, सुजल कोहळे, दीप हरणे, केशव राठी आणि राम बजाज यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. श्रीमती ठाकरे, श्रीमती सावदेकर आणि वैष्णवी बावस्कर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. डॉ. संदीप दलाल, निलिमा दलाल, रोहिणी वारेकर, अनिता दलाल आणि संगीत वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कला वैभव संगीत अकॅडमीने केवळ भारतातच नव्हे, तर रशिया, चीन आणि युरोपसह विविध देशांमध्ये शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार केला आहे. संगीततज्ज्ञ अरविंद दलाल, पंडित वामनराव धावंजेवार, उस्ताद लड्डू मियां खा साहेब, डॉ. देवेंद्र यादव आणि गुरुवर्य मुकुंद सराफ यांनी यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
