खोलापूर येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली:स्वच्छता, आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीबाबत संदेश
![]()
जागतिक आरोग्य दिनानिमित्त खोलापूर येथे विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेच्या वतीने ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीद्वारे स्वच्छता, आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. शाळेच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी “स्वच्छ गाव – निरोगी गाव”, “आरोग्य हेच धन आहे” आणि “हात धुवा, रोग टाळा” अशा घोषणा देत संपूर्ण गावातून फेरी काढली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांच्या हातात आरोग्यविषयक संदेश देणारे फलक होते. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या रॅलीमध्ये आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तिका आणि आशा वर्कर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना स्वच्छता, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगितले. मुख्याध्यापक विनीत पारडे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी नियमित व्यायाम, स्वच्छता आणि संतुलित आहारावर भर देण्याचे आवाहन केले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन केले. या यशस्वी रॅलीमुळे गावात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यामध्ये लखनसिंग जाधव, आशिष भुयार, कविता भेले, मंगेश ढाकर आणि मुख्याध्यापक विनीत पारडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
