भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध माकपची नांदगाव खंडेश्वर येथे निदर्शने:39 आमदारांच्या राजीनाम्यासह पीडित महिलांना न्याय देण्याची मागणी
![]()
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) नांदगाव खंडेश्वर येथे तीव्र निदर्शने केली. खरातवर कठोर कारवाई करण्यासोबतच त्याच्या संपर्कात असलेल्या ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बस स्टॉपसमोर हे आंदोलन केले. माकपच्या मते, अशोक खरात याने बुवाबाजीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. राज्यातील ३९ आमदार खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील झाले असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. या आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी आणि त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी माकपने केली आहे. तसेच, पीडित महिलांचे समाजमाध्यमांवर व्हायरल होणारे व्हिडिओ त्वरित हटवण्यात यावेत, अशी विनंतीही करण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करून ते तातडीने कार्यान्वित करावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात तहसीलदारांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. निवडून आलेले लोकप्रतिनिधी संविधानिक पदावर असतात आणि संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची व तो जनतेत रुजवण्याची जबाबदारी दिली आहे. ही संविधानिक जबाबदारी पार न पाडता, उलट वर्तन करणे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्याचे उल्लंघन आहे, असे माकपने म्हटले आहे. अशा लोकप्रतिनिधींमुळे तंत्र-मंत्र, जादू-टोणा यांसारख्या अंधश्रद्धांना राजमान्यता मिळते आणि सामान्य जनता भोंदू बाबांच्या फसवणुकीला बळी पडते. भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत, तितकेच त्यांना समर्थन देणारे, त्यांच्याकडे शरण जाणारे आणि आपल्या अनुयायांना अशा बुवा-बाबांवर विश्वास ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिशानिर्देश करणारे लोकप्रतिनिधीही गुन्हेगार आहेत. अशा गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. हे व्हिडिओ समाज माध्यमांतून तातडीने हटवण्याची कारवाई राज्य सरकारने करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात माकपचे तालुका सचिव शाम शिंदे, अशोक केसारखाने, विजय पाटील, योगेश महल्ले, दीपक अंबाडरे, राजेंद्र राऊत, प्रभाकर खडसे, दिलीप महल्ले, शत्रुघ्न नगर, लक्ष्मण झिमटे, रामदास मते, नारायण सोनोने, ज्ञानेश्वर शिंदे, मारुती बंड, विशाल शिंदे, किशोर शिंदे, लालचंद इंगोले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
