आयुष विद्यार्थ्यांवर ‘नेक्स्ट-आयुष’ परीक्षेची सक्ती नको; २०२४-२५ च्या नव्या बॅचपासूनच लागू करण्याची मागणी राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संघटनेच्या निमा स्टुडंट फोरमचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतून सूट देण्याची मागणी नांदेड / प्रतिनिधी : बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस या आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांवर ‘नेक्स्ट-आयुष’ परीक्षा लागू करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत ही परीक्षा २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच लागू करावी, अशी मागणी राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संघटनेच्या (निमा) स्टुडंट फोरम, हिंगोली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन देण्यात आले. २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना ‘नेक्स्ट-आयुष’ परीक्षेबाबत स्पष्ट अंतिम सूचना, निश्चित अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती तसेच पुरेशी तयारी करण्याची संधी उपलब्ध नव्हती. असे असताना या विद्यार्थ्यांवर नवीन परीक्षा पद्धती लागू करणे अन्यायकारक असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अनिश्चितता आणि मानसिक ताण निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, ११ जून २०२५ रोजी आयुष मंत्र्यांनी २०२१-२२ आणि २०२२-२३ या बॅचसाठी ‘नेक्स्ट’ परीक्षा रद्द असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर ९ सप्टेंबर २०२५ रोजी २०२१-२२ च्या बॅचपासून ही परीक्षा लागू करण्यासंदर्भातील सूचना प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, २२ जुलै २०२५ रोजी राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने (एनसीएच) २०२४-२५ च्या बॅचपासून ‘नेक्स्ट-आयुष’ परीक्षा लागू करण्याची शिफारस केल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सूट देण्याची मागणी ‘नेक्स्ट-आयुष’ परीक्षा २०२४-२५ च्या बॅचपासून लागू करावी, तसेच २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या बॅचमधील विद्यार्थ्यांना या परीक्षेतून पूर्णतः सूट द्यावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. यासंदर्भात शासनाने स्पष्ट, अंतिम आणि लेखी अधिसूचना तातडीने जारी करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणातील नवीन परीक्षा प्रणाली लागू करताना विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी, निश्चित अभ्यासक्रम आणि तयारीची योग्य संधी मिळणे आवश्यक आहे. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम नवीन बॅचपासून लागू करण्याचे धोरण असेल, तर आयुष वैद्यकीय शाखांतील विद्यार्थ्यांनाही समान न्याय मिळायला हवा. त्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता जुन्या बॅचवर नवीन परीक्षा पद्धती लादू नये, अशी भूमिका संघटनेने मांडली. ही मागणी कोणत्याही विशेष सवलतीसाठी नसून, शैक्षणिक समानता, न्याय, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे संरक्षण करण्यासाठी असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी निमा स्टुडंट फोरमचे जिल्हाध्यक्ष डॉ. विश्वजित देवकत्ते, डॉ. बळवंत मोरे, डॉ. दिनेश मोरे, डॉ. तन्मय तिव्हाळे, डॉ. निरंजन पवार आणि डॉ. पवन सोळंके उपस्थित होते. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 120 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation श्याम नगर नांदेड येथे शाहिरीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश डॉ. दत्ता आंबेकर यांना पीएच.डी. पदवी