नांदेड (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांनी कर्जाच्या तगाद्यामुळे आत्महत्या करू नये. राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही शासन उचलणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मायक्रो फायनान्स कंपन्या, बँका आणि सावकारांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. वाडी बुद्रुक येथे १ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फायनान्स कंपनीमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी संकटाच्या काळात धीर सोडू नये. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार उभे आहे. मुलांच्या शिक्षणाच्या फीसह कुटुंबाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन मदत करेल. शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाची चिंता करू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले. हदगाव येथे आ. बाबुराव कदम यांनी १०० मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्याच धर्तीवर शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाचा खर्च उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सिंचन क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी अकरा जलसंपदा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, १४ हजार ४०० कोटी रुपयांच्या पाणी योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आपण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५५० कोटी रुपयांची मदत केली होती, असे शिंदे यांनी सांगितले. शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी विकासकामांसाठी निधीची चिंता करू नये, विकासकामे करा, असे निर्देशही त्यांनी दिले. आ. बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान आ. बालाजी कल्याणकर यांनी वाडी बुद्रुक येथे एसटी बसस्थानक उभारण्याची मागणी केली. त्यावर तात्काळ प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून गावात वसस्थानक उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे गावात एसटी वसेस येण्याचा मार्ग मोकळा होईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनावरूनही त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. या रुग्णालयाचे उद्घाटन काही जणांनी अंधारात केले, मग दिवसाढवळ्या उद्घाटन का केले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. हेमंत पाटील, आ. वालाजी कल्याणकर, आ. आनंद पाटील बोंढारकर, आ. बाबुराव कदम, आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटील, आरोग्य आयुक्त संजय काटकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे सिव्हिल सर्जन डॉ. पेरके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. Post Views: 89 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हिमायतनगर तालुक्यात आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी निर्देश हे देश भगतसिंगांचा आहे, माफीवीर सावरकरांचा नाही! – रामलीला मैदानात नेहा बोरा यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला