मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता लॉरेन्स बिष्णोई गँगने आपला मोर्चा नागपूरकडे वळवला आहे. टायगरवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत बॉलिवूडला धमकी देणाऱ्या या गँगने आता थेट नागपूरमधील आठ सराफा व्यापाऱ्यांना टार्गेट केले आहे. या व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने खंडणीची धमकी देणारी पत्रे पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून, यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पत्राद्वारे प्रत्येक सराफा व्यापाऱ्याकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. “10 लाख रुपये द्या, नाहीतर तुमचे तुकडे करू. पैसे दिले नाहीत तर टायगर श्रॉफप्रमाणे तुम्हालाही गोळ्या घालून मारू,” अशी थेट आणि गंभीर धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांकडे पैशांची जमवाजमव झाल्यानंतर त्यांनी दुकानासमोर ‘जय श्री राम’ असे लिहावे, जेणेकरून पैसे देण्याची तयारी असल्याचे खंडणीखोरांना समजेल, असा मेसेजही यात लिहिला आहे. तसेच, पत्रात व्यापाऱ्यांना मध्यमवर्गीय म्हणत शिवीगाळही करण्यात आली आहे. ही सर्व आठही पत्रे व्यापाऱ्यांना पोस्टाद्वारे पाठवण्यात आली आहेत. या पत्रांची प्राथमिक पाहणी केली असता, आठही पत्रांमधील हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पत्रांमध्ये लॉरेन्स बिष्णोई यांच्या नावाचा आणि ‘जय श्री राम’ या शब्दांचा प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे. एकाच वेळी शहरातील आठ मोठ्या व्यापाऱ्यांना पोस्टाद्वारे अशा प्रकारची पत्रे आल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत नागपूर पोलिसांत तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या धमकीच्या पत्रांचा सखोल तपास सुरू केला आहे. पत्र पाठवणारी व्यक्ती कोण आहे आणि ती कुठून आली, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील संपूर्ण सराफा बाजारात आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती ‘ऑल इंडिया ज्वेलरी असोसिएशन’चे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिली आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search