नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून अवैधपणे रेतीचा उपसा आणि साठवणूक करणाऱ्या वाळू माफियांविरोधात नांदेडच्या विमानतळ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राबवलेल्या या धडक मोहिमेत पोलिसांनी एक पोकलेन मशीन, वाळूने भरलेला टिप्पर आणि ६३ ब्रास वाळू असा एकूण २८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

गोदावरी नदीपात्रातून चालणारा बेकायदेशीर वाळू उपसा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासनाचा महसूल बुडवणारे प्रकार समूळ मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशावरून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत देशपांडे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की ब्राह्मणवाडा ते पाथरड जाणाऱ्या रस्त्यावर काही इसम गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना बेकायदेशीर वाळूचा उपसा करून वाहनात भरत आहेत.

प्राप्त माहितीवरून पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन ब्राह्मणवाडा ते पाथरड रस्त्यावर छापा टाकला. तेथे एक टाटा कंपनीचा टिप्पर (क्र. MH-26-AD-1206) वाळूने भरलेला आढळला. चालक दिगंबर माधव सोनटक्के (वय ३२, रा. ब्राह्मणवाडा, जि. नांदेड) याच्याकडे रेती उत्खनन किंवा वाहतुकीचा परवाना अथवा रॉयल्टी पावती नव्हती. तसेच रस्त्याच्या कडेला टाटा हिताची पोकलेन मशीनच्या साहाय्याने गोदावरी नदीपात्रातून उपसा करून ६० ब्रास वाळूचा साठा विक्रीसाठी ठेवल्याचे निष्पन्न झाले. हा अवैध वाळू साठा विठ्ठल बालाजीराव मोरे (रा. ब्राह्मणवाडा) याचा असल्याचे चालकाने सांगितले.

पोलिसांनी पंचांसमक्ष ५ लाखांचा टिप्पर, १५ हजारांची ३ ब्रास वाळू, २० लाखांचे पोकलेन मशीन आणि ३ लाखांची ६० ब्रास वाळू असा २८ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५३८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रामदास शेंडगे, उपनिरीक्षक हेमंत देशपांडे व अंमलदार तेलंगे, पोवळे, आलेवार, राणे यांनी केली. अवैध धंद्यांचे उच्चाटन सुरूच राहील.

 


Post Views: 5










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search