नागपूरमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ:दोसर भवन चौकात जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने चिंता
![]()
नागपूर शहरातील दोसर भवन चौकातील लांजेवार इमारतीत बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली. माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर सील केला. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकालाही (BDDS) पाचारण करण्यात आले. तपासणीदरम्यान जिलेटीनच्या कांड्या आढळल्याची माहिती आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. मोमीनपुरासारखा संवेदनशील परिसर जवळ असल्याने पोलिसांनी तात्काळ सतर्कता बाळगली. सेंट्रल ॲव्हेन्यूकडून बजेरियाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. घटनास्थळाजवळ एक पेट्रोलपंप आणि सरस्वती हायस्कूल असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात आली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने केलेल्या तपासणीत १५ जिलेटीनच्या कांड्या, ५० डिटोनेटर आणि ८ कनेक्टर सापडले. मिळालेल्या माहितीनुसार, लांजेवार इमारतीत गेल्या महिनाभरापासून स्फोटकांनी भरलेली एक बॅग ठेवलेली होती. हे स्फोटक १ मार्च रोजी काटोल येथील एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटाशी संबंधित असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी ९ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरच्या गणेशपेठ बस स्टँडजवळील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेलद्वारे पोलिसांना मिळाली होती. त्यावेळीही पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून हॉटेलमधील लोकांना बाहेर काढले होते. मात्र, नंतर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले होते.
