जैन, मराठा समाजाचे शांततेचे आवाहन:पुण्यात घेतली संयुक्त पत्रकार परिषद; जैन मुनीने ताराराणींविषयी केले होते आक्षेपार्ह विधान
![]()
मुंबईत दोन जैन मुनींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी ताराबाई यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर पुण्यात जैन आणि मराठा समाजातर्फे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. समाजात कोणताही गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही परिषद घेण्यात आली. या परिषदेत दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, संबंधित वक्तव्यांचा जैन समाजाशी कोणताही संबंध नाही. ही विधाने वैयक्तिक असून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जैन समाजाने अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध केला. युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर आणि अभिमान आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांना कोणताही पाठिंबा नसून ती संबंधित व्यक्तींची वैयक्तिक मते आहेत. समाजात तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांना एकत्रितपणे विरोध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. मराठा मोर्चाचे अनिकेत देशमाने यांनी जैन समाजाने घेतलेल्या स्पष्ट भूमिकेचे स्वागत केले. कोणत्याही गैरसमजाला वाव न देता शांतता आणि एकता टिकवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भावना तीव्र असल्या तरी संयम राखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जितो पुणेचे लक्ष्मीकांत खाबिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अतुलनीय असल्याचे सांगितले. त्यांचे मोजमाप करण्याचा अधिकार कोणालाही नाही. जैन समाज नेहमीच शांतता, सहिष्णुता आणि परस्पर आदर यांचा पुरस्कार करतो, त्यामुळे अशा वक्तव्यांना समाजात स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत दोन्ही समाजांनी एकत्रितपणे महाराष्ट्रातील एकता, बंधुता आणि परस्पर सन्मानाची परंपरा जपण्याचा निर्धार व्यक्त केला. अफवा आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहून संवाद आणि संयमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा टिकवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या परिषदेला अक्षय जैन, अनिकेत देशमाने, लक्ष्मीकांत खाबिया, दिनेश सुतार, मिलिंद फडे, सुधीर मते, राजेंद्र सुराणा, नितीन जैन, अनिल भोसुरे, गोविंद पवार, समाधान नागवे, माऊली दुचाल, अर्चना शहा, श्रीपाल ललवाणी, दिलीप खोबरे, रमेश पाटील, डॉ. सुजाता बरगळे, अनिल भंडारी, अँडी जय कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.
