पुण्यात विनापरवाना हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा:1.47 लाखांचे साहित्य जप्त, सात जणांना घेतले ताब्यात
![]()
पुणे शहरातील विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १ लाख ४७ हजार ५५० रुपयांचे हुक्का साहित्य, विदेशी दारू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कोंबिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथक-२ हे परिमंडळ ७ हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अॅटलान्टिस रूफ टॉप लाऊंज हॉटेल, विमाननगर येथे अवैधरित्या हुक्का पार्लर चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. या वेळी हॉटेलमध्ये हुक्का सेवा सुरू असल्याचे आढळून आले, तसेच विनापरवाना विदेशी दारूचा साठा करून विक्री सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणात स्वप्निल तांबे (३२), अमेय अजमीरे (२८), नवरंग कोल्हे (२८), अमितकुमार गोयल (२६), कमरूल लष्कर (२६), शिवम यादव (२३) आणि माहरुफ आलम (१८) या सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून हुक्का पॉट, दारूच्या बाटल्या, विविध साहित्य आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कलमे लावण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली. अवैध धंद्यांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
