सायली सुर्वे प्रकरणात पूर्वाश्रमीच्या पतीवर गंभीर आरोप:मिलिंद एकबोटेंचा दावा, आतिफ तासेवर विविध गुन्हे नोंद
![]()
सायली उर्फ आद्या शैलेश सुर्वे यांच्या घरवापसी प्रकरणात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. सायली यांचे पूर्वाश्रमीचे पती आतिफ तासे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचा आरोप समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी समीर कुलकर्णीही उपस्थित होते. एकबोटे यांच्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांपासून आतिफ तासेने सुर्वे कुटुंबाला मानसिक व शारीरिक छळ दिला. सततच्या मारहाण आणि अत्याचारामुळे सायली यांनी अखेर घटस्फोट घेऊन घरवापसीचा निर्णय घेतला. आतिफ तासेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, भ्रष्टाचारामुळे प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही एकबोटे यांनी केला. त्यामुळे तो समाजात मुक्तपणे वावरत असून नागरिकांना त्रास देत असल्याचे म्हटले आहे. आतिफ तासेची आई गुलशन पटेल हिच्यावरही जमीन बळकावण्याचे गंभीर आरोप आहेत. मीरा-भाईंदर तसेच मनोर भागात आदिवासींच्या जमिनी हडपल्याचे प्रकरण समोर आले आहे. याशिवाय, सय्यद गोहर शहा बाबा दर्गा परिसरात अतिक्रमण करून शासकीय जमीन बळकावल्याचेही आरोप आहेत. आई-मुलगा मिळून ‘लँड माफिया’ स्वरूपात काम करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. सायली सुर्वे यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे त्यांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात भिडे गुरुजी, खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार उमा खापरे यांनी सहकार्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, फरार आरोपी आतिफ तासे याला तातडीने अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी एकबोटे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
