मेट्रो उद्घाटनावेळी गप्पा रंगल्या:प्रताप सरनाईक म्हणाले- नरेंद्र मेहता 30 टक्के जमिनीतील 10 टक्के द्यायला तयार; CM म्हणाले- सगळं रेकॉर्ड होतंय
![]()
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पैसा आणि जमिनींच्या व्यवहारांवरून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतानाच, दहिसर ते काशीगाव मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात एक अतिशय मिश्किल आणि चर्चेत राहणारा प्रसंग घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या नव्या मेट्रोने प्रवास केला. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरे सोबत असतानाच नेत्यांमध्ये गप्पांचा फड रंगला होता. मिरा-भाईंदरच्या विकासावर चर्चा सुरू असतानाच या प्रवासादरम्यान झालेल्या एका अनपेक्षित संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गप्पांच्या ओघात प्रताप सरनाईक यांचे स्वतःभोवती असलेल्या कॅमेऱ्यांकडचे लक्ष विसरले आणि त्यांनी मजेत बोलताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मिरा-भाईंदरमधील जमिनींचा उल्लेख केला. सरनाईक यांचा हा ऑफ द रेकॉर्ड वाटणारा संवाद कॅमेऱ्यात कैद होऊ नये, याची तत्परता दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तातडीने सावध केले. “आपण चकाला चकाला करत बसू आणि हे सगळे रेकॉर्ड करतील”, असे म्हणत फडणवीसांनी सरनाईक यांना अधिक बोलण्यापासून थांबवल्याचे पाहायला मिळाले. मीरा-भाईंदरमध्ये 30 टक्के जागा नरेंद्र मेहतांची दहिसर ते काशीगाव मेट्रोचे उद्घाटन करत असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे तसेच प्रताप सरनाईक यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रवास केला. यावेळी नेत्यांमध्ये गप्पांचं फड रंगला होता. यावेळी सरनाईक फडणवीस यांच्याकडे बघून हसत म्हणाले, मीरा-भाईंदरमध्ये 30 टक्के जागा नरेंद्र मेहता यांची आहे. त्यापैकी 10 टक्के जागा ते मला द्यायला तयार आहेत. यावर उपस्थित सर्व नेत्यांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. प्रताप सरनाईक बोलत असताना मागून त्यांना नरेंद्र मेहता खांद्याला हात लावत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र मस्करीच्या नादात सरनाईक बोलतच राहिले. हे सगळे आपले रेकॉर्ड करतील- देवेंद्र फडणवीस प्रताप सरनाईक बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सावध करत म्हटले की, आपण चकाला चकाला करू आणि येथे हे सगळे आपले रेकॉर्ड करतील, असे म्हणत वातावरण आणखी रंगवले. त्यांच्या या वक्तव्याने आणखी हशा पिकला. असे असले तरी प्रताप सरनाईक यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, दहिसर–काशीगाव मेट्रो मार्गाच्या उद्घाटनादरम्यान काशीगाव स्थानकावरील रखडलेल्या जिन्याच्या कामाचा विषय विशेष चर्चेचा ठरला आहे. या कामात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची जमीन अडथळा ठरत असून त्यांची कंपनी अधिक मोबदल्याची मागणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. नेमका हाच धागा पकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच नरेंद्र मेहता यांना मिश्किल टोमणा मारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सरनाईक यांनी गप्पांच्या ओघात अशा पद्धतीने गुगली टाकून भर मेट्रो प्रवासात मेहता यांची कोंडी केल्याची चर्चा आता रंगू लागली असून, या एका टोमण्याने विकासकामातील अंतर्गत वादावरही प्रकाश टाकला आहे.
