पार्थ काँग्रेसच्या बाबतीत चुकला:रोहित पवारांनीही टोचले पार्थ पवारांचे कान; म्हणाले – कोणताही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणे महत्त्वाचे
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याची टीका करणाऱ्या पार्थ पवारांचे कान टोचलेत. पार्थ पवार काँग्रेसच्या बाबतीत चुकले. असा कोणताही पक्ष संपत नसतो. या प्रकरणी नेहमी जमिनीवर राहणे महत्त्वाचे, असे ते म्हणालेत. पार्थ पवार यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधताना राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका केली होती. विशेषतः शरद पवार व सुप्रिया सुळेंनीही या प्रकरणी पार्थ पवारांचे कान टोचले होते. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनीही पार्थ पवारांचे काँग्रेसचे विषयीचे विधान चुकल्याचा दावा केला आहे. तसेच बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसशी संवाद साधतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. पार्थ पवारांचे काँग्रेसबाबतचे विधान चुकले रोहित पवार म्हणाले, फॉर्म भरण्याची एक तारीख असते आणि फॉर्म मागे घेण्याची दुसरी तारीख असते. बऱ्याच मतदारसंघात अनेकजण फॉर्म भरतात आणि मागे घेतात. त्यासाठी संवाद व चर्चा करायची असते. या प्रकरणी एक राजकीय परिपक्वता दाखवायची असते. पण काल पार्थ पवारांनी घाईगडबडीने स्टेटमेंट केले. तरीसुद्धा काकी स्वतः असतील किंवा त्यांचे इतर नेते असतील, ते काँग्रेसशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढतील. तुम्ही सत्तेत असला काय किंवा विरोधात असला काय, तुम्ही जमिनीवर राहणे महत्त्वाचे असते. काल पार्थ पवारांनी केलेले विधान योग्य नव्हते. त्यात कुठे ना कुठे तरी घाईगडबड जाणवली. कोणताही पक्ष असा संपत नसतो. सर्व पक्ष आपापल्या पातळीवर आपली ताकद लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल संपला वगैरे म्हणणे योग्य नव्हतच. तुम्ही आज पार्थ पवारांशी बोललात, तर तो सुद्धा काल आपण थोडेसे बोलून गेल्याचे व आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचे मान्य करेल. पण त्याचे विधान योग्य नव्हते. आता त्यांच्या पक्षाचे नेते काँग्रेसशी सुसंवाद साधतील अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. पार्थ पवारांना कृतघ्न म्हणणे योग्य नाही रोहित पवार यांनी यावेळी काँग्रेसने अजित पवार व पार्थ पवारांवर घेतलेल्या भूमिकेवरही भाष्य केले. ते म्हणाले, पार्थ पवार अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्यावर शांत राहतील किंवा नाही हे कुणालाच माहिती नाही. कदाचित ते त्यांच्या पातळीवर प्रयत्न करतही असतील. यासंबंधी जय पवारही सातत्याने प्रयत्न करत होते. खऱ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. या अपघाताच्या चौकशीचा प्रस्ताव सीबीआयकडे देण्याची कल्पना सुनेत्राकाकी तथा पार्थ व जयची असू शकते. त्यात आणखी कुणाचे योगदान आहे हे सांगता येणार नाही. पण दुर्दैव असे की, अजूनतरी तो विषय सीबीआयकडे गेला नाही. पार्थ पवार कदाचित काल चुकले असतील, पण एका मुलाची आपल्या वडिलांविषयी जी भावना असते, तीच त्यांची भावना आहे हे मी खात्रीने सांगतो. कारण, तो माझा भाऊ आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख कृतघ्न असा करणे योग्य नाही. पण अजित पवारांच्या मृत्यूविषयी महाराष्ट्रात एफआयआर दाखल होत नव्हता. तेव्हा काँग्रेस शासित कर्नाटकात हा एफआयआर दाखल करण्यात आला. त्याविषयी आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे रोहित पवार म्हणाले. भोंदू खरात व अजितदादांच्या अपघातावरही भाष्य रोहित पवार यांनी यावेळी भोंदू अशोक खरात व अजित पवारांच्या अपघाताच्या कथित परस्पर संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले, भोंदू अशोक खरातच्या समता पतसंस्थेच्या बँक खात्यांत अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस अगोदर, अपघाताच्या दिवशी व अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले होते. त्यामुळे यात एखादे कटकारस्थान असू शकते. त्यामुळे आम्ही जेव्हा गुन्हेगारी कट कारस्थान म्हणतो तेव्हा त्याविषयी येणाऱ्या सर्वच शंकांचा त्या कटात समावेश होतो. त्यामुळे खरातच्या प्रकरणाकडे पाहत असताना अंधश्रद्धा व हे विषय आहेतच. ते आपल्याला पटतच नाहीत. पण अजित पवारांच्या बाबती बोलायचे झाले तर आदल्या दिवशी, त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी व्यवहार झाल्याचे दिसून येत असतील, तर काही ना काही निश्चित झाले असेल. कारण, अजित पवारांच्या मुंबई व बारामती येथील घराबाहेर काळ्या जादूची पूजा झाली होती हे खरे आहे. त्यामुळे खरात प्रकरणात या आर्थिक व्यवहार, मनी लाँड्रिंग व पैशांचे काही रिलेशन आहे का? हे तपासून पाहावे लागेल, असे रोहित पवार म्हणाले.
