सुप्रिया सुळेंनीही टोचले पार्थ पवारांचे कान:म्हणाल्या – स्वातंत्र्य ही काँग्रेस पक्षाचीच देण, मी अन् दादाही काँग्रेसच्याच तालमीत वाढलो

0
dbbreakingnewsfinal-617252920551763274424_1775543865.jpg




भारतीय राजकारणात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान अत्यंत मोठे आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत, तसेच महिला आरक्षणापासून ते देशाने जिंकलेल्या युद्धांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. हे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसची पाठराखण केली. तसेच, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असला तरी मर्यादांचे भान हवे, असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, भारतातील संविधानाच्या चौकटीत राहून कोणताही पक्ष काम करत असेल, तर आपण लोकशाही मानणारी माणसे म्हणून त्याचा आदर केला पाहिजे. आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाला अत्यंत जवळून पाहिले आहे. मी स्वतः अनेकदा काँग्रेसच्या साथीने निवडणूक लढवून निवडून आले आहे. मी आणि दादा (अजित पवार) दोघेही काँग्रेसच्याच तालमीत लहानाचे मोठे झालो आहोत. आज आपण जो मोकळा श्वास घेतोय आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, ती काँग्रेसची देण आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
पार्थ पवारांच्या संदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना सुळे म्हणाल्या की, “कौटुंबिक सल्ले हे घराच्या चार भिंतींच्या आत दिले जातात, ते माध्यमांसमोर जाहीरपणे सांगायचे नसतात. मात्र, जेव्हा घरातील मोठी व्यक्ती काही बोलते, तेव्हा त्यावर प्रतिवाद न करणे किंवा उलट न बोलणे हे आमचे संस्कार आहेत.” या विधानातून त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेचे पूर्णपणे समर्थन केले आहे. मविआचे मानले आभार शरद पवार यांची राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीसह महायुतीतील नेत्यांचेही आभार मानले. त्या म्हणाल्या, विरोधक हा आपला शत्रू नसून ती केवळ एक वैचारिक लढाई आहे, व्यक्तिगत नाही, हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्राने जपला आहे. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, हीच आपली संस्कृती आहे. याच सामंजस्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडली. काँग्रेसने घेतलेली भूमिका लोकशाहीला धरूनच राज्यातील पोटनिवडणुकांच्या मुद्द्यावर बोलताना सुळे यांनी स्पष्ट केले की, अनेकदा पोटनिवडणुका बिनविरोध होतात, तर कधी त्या लढवल्या जातात. काँग्रेसने यासंदर्भात घेतलेली भूमिका लोकशाहीला धरूनच आहे, त्यात काहीही गैर वाटत नाही. काँग्रेसशी कोणी संपर्क केला की नाही, याबद्दल मला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed