महिला पोलिस अधिकारीही खरातच्या संपर्कात:पसंतीच्या पोस्टिंगसाठी खरातशी संपर्क? निमयबाह्य मदत; DCP अन् ACP दर्जाच्या अधिकारी
![]()
राज्यातील दोन उच्चपदस्थ पोलिस अधिकारी भोंदू अशोक खरातच्या संपर्कात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या अधिकारी डीसीपी व एसीपी दर्जाच्या आहेत. त्या आवडत्या पोस्टिंगसाठी भोंदू अशोक खरातच्या संपर्कात आल्या होत्या. आता त्यांच्यामागे एसआयटी चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात राजकीय नेत्यांसह उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांची नावे आल्यामुळे या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत त्याच्यावर 13 गुन्हे दाखल झालेत. यातील 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे, 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे, तर एक गुन्हा ईडीने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा आहे. त्यातच आता त्याला नाशिकमध्ये कार्यरत असणाऱ्या 2 महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मोठी मदत केल्याची बाब समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या. यापैकी एक महिला अधिकारी डीसीपी, तर दुसरी एसीपी दर्जाची होती. या दोघी आपल्याला पसंतीची पोस्टिंग मिळावी यासाठी अशोक खरातच्या संपर्कात आल्या होत्या. आता त्यांनी भोंदू खरातशी काही आर्थिक व्यवहार केले होते का? याचा धुंडाळा विशेष पोलिस तपास घेत आहे. नियमबाह्य मदत केल्याचा आरोप नाशिकमध्ये एकेकाळी बड्या पदावर कार्यरत असलेल्या या महिला अधिकाऱ्याने अशोक खरात याला नियमबाह्य मदत केल्याचा व दोघांमध्ये पैशांचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे ही महिला अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सदर महिला अधिकाऱ्याने नाशिकमध्ये कार्यरत असताना अनेक प्रशासकीय कामांत अशोक खरातला नियमबाह्य मदत केली होती. या मदतीच्या बदल्यात खरातने आपले राजकीय लागेबांधे व नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला हवी असलेली पोस्टिंग मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे केवळ बदलीपुरते मर्यादित नाही, तर या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचेही तपासात समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे भोंदू खरातच्या काळ्या साम्राज्याला या अधिकाऱ्याचे संरक्षण लाभले होते का? या दिशेने SIT आता तपास करत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा संशयाचा वेढा अधिक घट्ट झाला असून, लवकरच या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची चिन्हे आहेत. भोंदू खरातने दिली लैंगिक शोषणाची कबुली दुसरीकडे, अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिकला विज्ञानाचे नाव दिले आहे. त्याच्या मते, त्याने चमत्कार व वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकावून त्यांचे शोषण केले. ज्या गोष्टींना लोक चमत्कार व वशीकरण समजतात, मुळात ती हातचलाखी आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असे तो या प्रकरणी म्हणाल्याचे माहिती आहे. आज अशोक खरातच्या मुलांची चौकशी या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आज अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन व मुलीची चौकशी करणार आहे. खरातचा मुलगा दोन दिवसांपूर्वी संपर्काबाहेर असल्याची बाब समोर आली होती. पण आता तो पोलिसांच्या संपर्कात आला आहे. त्यामुळे त्याला आज पुन्हा त्याची त्याच्या बहिणीसह चौकशी होणार आहे. या दोघांची आई कल्पना ही मात्र अजून फरार आहे.
