भाजप बंगालमध्ये 200 तर आसाममध्ये 90 पार?:फेरफार करून निकाल बदलले जाण्याची भीती- प्रकाश आंबेडकर
![]()
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर तब्बल 76 लाख वाढीव मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला असून, आंध्र प्रदेशातील रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतदानाला ‘फ्रॉड’ निर्मला सीतारमण यांच्या पतीने बोगस ठरवल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच धर्तीवर आगामी काळात तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निकालांचे चित्र फेरफार करून भाजपच्या पथ्यावर पाडले जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी निवडणूक रिटर्निंग ऑफिसरला कठोर तंबी देऊन निवडणूक यंत्रणेवर वचक निर्माण करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. नेमके आंबेडकर काय म्हणाले? प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तब्बल 76 लाख वाढीव मतदान झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत संशयास्पद असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांनीदेखील आंध्र प्रदेश निवडणुकीबाबत असेच दावे केले आहेत. आंध्र प्रदेशात रात्री 9 ते पहाटे 2 वाजेपर्यंत मतदान झाले आणि तो निकाल ‘फ्रॉड’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही परिस्थिती लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले. आगामी निवडणुकांबाबत भाकीत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर हीच परिस्थिती कायम राहिली आणि निवडणूक यंत्रणेवर वचक बसवला नाही, तर तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निकालांचे चित्र अनपेक्षितरीत्या बदलू शकते, असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागा आहे. यामध्ये AIADMK 150 जागा जिंकू शकते, तर भाजप 25 जागांवर विजय मिळवेल. सत्ताधारी स्टॅलिन, काँग्रेस आणि टीव्हीके पक्षाला मोठा फटका बसू शकतो. तर केरळमध्ये भाजप किमान 15 जागा जिंकण्याची शक्यता आहे. आसाममध्ये 126 जागा असलेल्या विधानसभेमध्ये भाजप 90 ते 92 जागा जिंकू शकते. तर ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी भाजप 180 ते 200 जागा जिंकण्याची शक्यता आंबेडकर यांनी वर्तवली आहे. तर पाँडिचेरीमध्ये भाजप आणि मित्रपक्ष मिळून 20 जागा जिंकू शकतात, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. रिटर्निंग ऑफिसरला तंबी द्या प्रकाश आंबेडकर यांनी ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), एम.के. स्टॅलिन व विजय (तामिळनाडू), आणि केरळ व आसाममधील काँग्रेस व डाव्या पक्षांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. जर हे निकाल बदलू द्यायचे नसतील, तर सर्व विरोधी पक्षांनी आतापासूनच दक्षता घ्यावी. प्रत्येक निवडणूक रिटर्निंग ऑफिसरला स्पष्ट तंबी द्यावी की, जर कायद्यानुसार काम झाले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आंबेडकर म्हणाले.
