दूसरा चांगला नवरा मिळवा म्हणून महिलेने घेतला चिमूकल्याचा जीव:सिमेंटच्या ओट्यावर डोके आपटून घेतला जीव, आरोपी आईला अटक
![]()
गुन्हेगारी, विकृती, निर्दयीपणा, क्रूरता, अमानुषपणा या सगळ्यांचाच मनुष्याने कळस गाठला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील एका घटनेने अक्षरशः माणुसकीला काळिमा फासलाय. एका महिलेने दूसरा चांगला नवरा करण्यासाठी पोटच्या 11 महिन्यांच्या बाळाचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून एखादी आई इतकी निष्ठुर कशी काय असू शकते असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे. मृत बाळाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी पूजा रवींद्र पवारला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका आईनेच आपल्या 11 महिन्यांच्या पोटच्या गोळ्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पूजा पवार ही कोकण-मुरुड पर्यटनावरून आली होती. मुलगा यश सतत रडत आणि किरकिर करत असल्याच्या कारणावरून तिने घर सोडून जाण्याचा आणि दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लहान मुलगा सोबत असल्यास कोणीही आपल्याशी लग्न करणार नाही, हा विचार तिच्या मनात आला आणि त्यातूनच आपल्या भविष्यातील सुखासाठी अडथळा ठरणाऱ्या निष्पाप मुलाला कायमचे संपवण्याचा क्रूर कट तिने रचला. चिमुरड्याचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून घेतला जीव माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत, आरोपी माता पूजा हिने आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या यशची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची कबुली दिली आहे. तिने चिमुरड्याचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला आणि त्यानंतर हा भयानक गुन्हा लपवण्यासाठी मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरून शेतातील विहिरीत फेकून दिला. स्वतःच्या सुखासाठी पोटच्या गोळ्याचा असा निर्दयीपणे बळी घेतल्याची माहिती समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. जन्मदात्या आईकडूनच घडलेल्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, निष्पाप बालकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मृत मुलाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
