'सरकारी कागदपत्रांवर अजूनही औरंगाबादच नाचतेय':अंबादास दानवेंची बोचरी टीका, पुरावा दाखवत म्हणाले- हा सरकारचा दुटप्पीपणा

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-07t113023791_1775541613.jpg




भाजप-महायुती सरकारने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे नामकरण केले आहे. त्यात प्रामुख्याने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, ही मागणी महायुतीने पूर्ण केली. त्यानंतर उस्मानाबादचे धाराशिव केले व अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात आले. असे असतानाही शासकीय कामांमध्ये व कागदपत्रांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख ‘औरंगाबाद’ करण्यात येत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी निदर्शनास आणले आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, नामांतराचे ढोल वाजवणाऱ्या भाजप-शिंदे-पवार सरकारच्या नाकाखाली, महसूल विभागाच्या कागदपत्रांवर अजूनही ‘औरंगाबाद’ नाचतेय. ही अधिकाऱ्यांची ‘मोगली मानसिकता’ आहे आणि सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. तसेच अंबादास दानवे पुढे म्हणाले, एकीकडे नावावरून निधी रोखण्याची धमकी द्यायची आणि दुसरीकडे सरकारी जीआरमध्ये औरंगाबादचीच शाई वापरायची; हा ‘आंधळेपणा’ नसून मुघल सरंजामशाहीचा प्रभाव आहे. तुमचे मंत्रालय आता शासन निर्णय कमी आणि शाही फर्मान अधिक काढते, असा टोला दानवे यांनी लगावला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत शासन निर्णयाचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये ‘औरंगाबाद’ असा उल्लेख केल्याचे दिसून येत आहे. अंबादास दानवे यांनी शेअर केलेला शासन निर्णय हा महसूल विभागाचा आहे. यात राज्यातील सहाही महसूल विभागातील महसूल यंत्रणेतील सर्व कार्यालयातील विविध संवर्गातील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव त्यावर शासनाने निर्णय घेतला आहे. यात विभागीय आयुक्तालयात 6 महसूल विभागांची नावे दिली आहेत. त्यात कोकण, पुणे, नाशिक, ‘औरंगाबाद’, अमरावती आणि नागपूरचे नाव आहे. यात विशेष लक्ष वेधले ते छत्रपती संभाजीनगरच्या जुन्या नावाने. यावरूनच अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed