“राज्यातील दुष्काळी संकटात बळीराजाला तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून, सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत दिवाळीपूर्वी थेट जमा केली जाईल. पुढील दोन दिवसांत हे पैसे खात्यात वर्ग होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच नांदेडमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेची सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, कोणत्याही मायक्रो फायनान्स कंपनीने किंवा सावकाराने शेतकऱ्यांना दमदाटी अथवा सक्तीची कर्जवसुली केल्यास तत्काळ गुन्हा नोंदवून संबंधित कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करा,” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांना (SP) दिले आहेत. मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी दुष्काळी मदत निधी, मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईचा बडगा यांसह कर्जत येथील 3,000 मेगावॉटच्या प्रस्तावित पंप स्टोअरेज जलविद्युत प्रकल्पाचे तांत्रिक व पर्यावरणीय महत्त्व आकडेवारीसह मांडत विरोधकांचे आक्षेप खोडून काढले. दीड कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 5,000 रुपये; दोन दिवसांत पैसे जमा होणार! शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक दिलाशाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “दुष्काळग्रस्त भागातील सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीची मदत म्हणून 5,000 रुपये जमा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला असून, आवश्यक निधीलाही तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे.” दिवाळीपूर्वी वाटप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट “येत्या दोन दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होण्यास सुरुवात होईल. ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडावा, यासाठी कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.” नांदेडसारखी घटना खपवून घेणार नाही मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीवर संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी सज्जड इशारा दिला. “नांदेडमध्ये फायनान्स कंपनीच्या त्रासामुळे शेतकऱ्याचा झालेला मृत्यू अत्यंत गंभीर आहे. राज्यभरातील सर्व पोलीस अधीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत की, कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार आल्यास विलंब न लावता तत्काळ गुन्हा दाखल करावा.” आरबीआयमार्फत कडक नियम “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपन्यांना कडक शब्दांत सांगण्यात येत आहे की, त्यांनी कुठेही दमदाटी किंवा बळाचा वापर करू नये. ज्या कंपन्या सक्तीने वसुली करतील, त्यांच्या केवळ वसुली प्रतिनिधींवरच नव्हे, तर थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई केली जाईल.” कर्जतचा 3,000 मेगावॉट प्रकल्प पूर्णपणे पर्यावरणपूरक कर्जत येथील पंप स्टोअरेज प्रकल्पावरून आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना फडणवीसांनी वस्तुस्थिती मांडली. “आपण सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्माण करतो, पण सायंकाळी 5 नंतर सूर्य नसतो आणि वारा नसेल तर वीज मिळत नाही. त्यामुळे ग्रीड स्थिर ठेवून 24 तास अखंड वीज देण्यासाठी जगभरात ‘पंप स्टोरेज’ ही एकमेव सर्वोत्तम पद्धत वापरली जाते. हा 3,000 मेगावॉटचा प्रकल्प असून यातून पीक अवर्समध्ये पूर्णपणे प्रदूषणमुक्त वीज मिळणार आहे.” 28 कोटी झाडांचे प्रदूषण टळणार “जर आपण पंप स्टोअरेज प्रकल्पाला विरोध करून 3,000 मेगावॉट वीज कोळशापासून तयार केली, तर त्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तब्बल 28 कोटी झाडे लावावी लागतील, जे अशक्य आहे. त्यामुळे तात्पुरत्या वृक्षतोडीपेक्षा भविष्यातील 100 वर्षांचे महाप्रचंड प्रदूषण हा प्रकल्प टाळणार आहे.” 90 हजार झाडांची लागवड अन् दुप्पट वनजमीन “या प्रकल्पासाठी जेवढी जमीन वापरली जात आहे, त्याच्या दुप्पट जागा वनविभागाला नवी वने तयार करण्यासाठी देण्यात आली आहे. याशिवाय प्रत्यक्ष प्रकल्प साईटवर 60,000 झाडे लावली जाणार असून, एकूण 90,000 वृक्षांची नव्याने लागवड केली जाईल. धरणासाठी जशी वनजमीन लागते, तशीच ही वॉटर बॉडी तयार करण्यासाठी जमीन देण्यात आली आहे.” 80 वर्षांचे आयुष्य अन् संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान; चायना बॅटरीला पर्याय! प्रकल्पाच्या तांत्रिक श्रेष्ठतेबाबत बोलताना त्यांनी जागतिक संदर्भ दिले. “सध्याच्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पांचे आयुष्य अवघे 25 वर्षे असते आणि त्यासाठीच्या सर्व बॅटऱ्या चीनमधून आयात कराव्या लागतात. याउलट, पंप स्टोअरेज प्रकल्पाचे आयुष्य तब्बल 80 वर्षे असते आणि हे तंत्रज्ञान 100% भारतात तयार होते, यासाठी चीनवर अवलंबून राहावे लागत नाही.” चीनचे उदाहरण “चीनने सौर आणि पवन ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी आतापर्यंत 60,000 मेगावॉटचे पंप स्टोअरेज उभे केले आहे आणि 2030 पर्यंत आणखी 1 लाख 50 हजार मेगावॉटचे काम सुरू आहे. म्हणजेच चीनमध्ये 2 लाख 10 हजार मेगावॉट क्षमतेचे पंप स्टोअरेज तयार होत आहे. भारतालाही कोळशाच्या प्रदूषणातून मुक्ती हवी असेल तर पंप स्टोरेज हाच मुख्य मार्ग आहे.” आरे कारशेडची आठवण “कर्जतसारख्या पश्चिम घाटातील जागा या पंप स्टोरेजसाठी सर्वाधिक व्यवहार्य आहेत. आरे कारशेडच्या वेळीही अशाच प्रकारे विनाअभ्यास विरोध करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, मेट्रो 3च्या 80 दिवसांच्या फेऱ्यांमुळे जितके कार्बन प्रदूषण रोखले जाईल, तेवढे ती झाडे आयुष्यभरातही करू शकणार नाहीत. कर्जत प्रकल्पाबाबतही तेच आहे. स्थानिक ग्रामस्थांचे काही शंका-मुद्दे असतील तर सरकार ते ऐकून घेण्यास तयार आहे; मात्र निव्वळ राजकारणासाठी सुरू असलेला विरोध अनाठाई आहे,” असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ——————————————————————– हेही वाचा… मंत्रिमंडळाचे 12 मोठे निर्णय: दुष्काळग्रस्त दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार अग्रीम, दिव्यांगांसाठी 1 टक्का निधी, ई-व्हेईकलसाठी अनुदान राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (२७ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत शेतकरी, दिव्यांग व्यक्ती, जलसंपदा विभाग, औद्योगिक विकास आणि हवाई वाहतूक यांसह विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांचे अग्रीम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 6 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation मंत्रिमंडळाचे 12 मोठे निर्णय:दुष्काळग्रस्त दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार अग्रीम, दिव्यांगांसाठी 1 टक्का निधी, ई-व्हेईकलसाठी अनुदान