“महाराष्ट्रात विजेची निर्मिती करणे ही चांगली गोष्ट असली, तरी त्यासाठी भीमाशंकरसारखे प्राचीन व घनदाट जंगल उद्ध्वस्त करणे पूर्णपणे चुकीचे आहे. वीज प्रकल्प उभारायचा असेल तर तो उजाड किंवा नापीक जमिनीवर उभारावा. अभिनेते सयाजी शिंदे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना जे आंदोलन करत आहेत, ते अगदी योग्य असून निसर्गाचा बळी देणारा एकही वृक्ष तोडू दिला जाणार नाही,” असा थेट इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी दिला आहे. माध्यमांशी बोलताना हुसेन दलवाई यांनी कर्जत-भीमाशंकर येथील टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पातील वृक्षतोड, मतदार याद्यांमधील एसआयआर (SIR) घोटाळा, मनोज जरांगे पाटील यांची कथित 500 कोटींची ऑडिओ क्लिप, व्यापाऱ्यांचे आंदोलन आणि 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महामोर्चावर सविस्तर भाष्य केले. भिवंडीत नागरिकांना छळणाऱ्या टोरंट कंपनीला भीमाशंकरची वनसंपदा का आंदण देताय? कर्जत तालुक्यातील जलविद्युत प्रकल्पावरून दलवाई यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “यावर्षी प्रचंड उष्णता आणि अवकाळी हवामानाचा फटका संपूर्ण राज्याला बसला आहे. निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडलेला असताना कोकणात आणि सह्याद्रीच्या पट्ट्यात सर्रास वृक्षतोड सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकाने झाड तोडले तर शासन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करते; मग स्वतः सरकारच कायद्याचे उल्लंघन करून हजारो झाडे कशी कापू शकते?” उजाड जमिनीवर प्रकल्प करा “टोरंट पॉवर कंपनीचा इतिहास चांगला नाही. भिवंडीमध्ये वीज वितरणाच्या नावाखाली ग्राहकांना कसा त्रास दिला जातो, हे सर्वांना ठाऊक आहे. वीजनिर्मितीला कोणाचा विरोध नाही, पण जिथे झाडे नाहीत, जी जमीन ओसाड आणि नापीक (बैरेन लँड) आहे तिथे हा प्रकल्प उभारावा. भीमाशंकरचे समृद्ध जंगल नष्ट करण्याचा घाट घालू नये.” सयाजी शिंदेंच्या आंदोलनाला पाठिंबा “ज्येष्ठ अभिनेते व पर्यावरण चळवळीचे नेते सयाजी शिंदे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी झाडे वाचवण्यासाठी जे आंदोलन पुकारले आहे, ते १०० टक्के योग्य आहे. या लढ्यात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.” एसआयआर (SIR) हा भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेला मोठा महाघोटाळा! निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेवर बोलताना त्यांनी केंद्रीय यंत्रणेवर गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी सुरुवातीला या प्रक्रियेला विरोध केला होता. परंतु, आता सरकारचा प्रचंड दबाव असल्याने ते सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. निवडणूक आयोग पूर्णपणे भाजपला मदत करण्यासाठी कार्यरत आहे.” 13 कोटी जनतेच्या अधिकारांवर गदा “देशभरात 13 कोटी नागरिकांचे मतदानाचे हक्क संशयास्पद पद्धतीने हिरावून घेण्यात आले आहेत. हा केवळ प्रशासकीय गोंधळ नसून मोठा राजकीय घपला आहे.” 500 कोटींची क्लिप म्हणजे अंतर्गत भांडणे मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी स्थापन केलेली एसआयटी ही सरकारच्याच अखत्यारीतील पोलिसांची आहे. सरकार सांगेल तसेच पोलीस काम करणार, त्यामुळे या चौकशीतून काही ठोस निष्पन्न होईल असे मला अजिबात वाटत नाही. ‘तुम्ही आरोप करा, आम्ही क्लीन चिट देऊ’ असा हा सगळा प्रकार आहे.” मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्याचा डाव “500 कोटी म्हणजे 1 कोटीवर किती शून्ये असतात, हे तरी त्या क्लिपमध्ये बढाया मारणाऱ्यांना ठाऊक आहे का? हे सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत राजकारण असून मनोज जरांगे पाटील यांचा यात केवळ बळी दिला जात आहे. सरकारच्या अपयशावरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठीच हा सगळा बनाव रचला गेला आहे.” व्यापाऱ्यांनी सरकारवर दबाव आणावा ऐन दिवाळीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनावर आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर त्यांनी स्पष्ट मत मांडले. “व्यापाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांची तळी उचलणे आधी थांबवले पाहिजे. सरकार जर रस्ते, मेट्रो आणि बाजारपेठा बंद करून जनतेला वेठीस धरत असेल, तर व्यापाऱ्यांनी थेट सरकारवर दबाव आणला पाहिजे. नागरिकांचे मूलभूत मतदानाचे अधिकार हिरावले जात असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे.” 1 नोव्हेंबरला रामलीला मैदानावर एल्गार “1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि मतचोरीविरोधात महामोर्चा निघणार आहे. या आंदोलनात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांची एकजूटच हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करेल.” मल्लिकार्जुन खरगेंच्या विधानाचा विपर्यास पंतप्रधानांवरील टिकेवरून भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांवर त्यांनी प्रत्युत्तर दिले. “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. त्यांच्या मनात मोदीजींचे वडील नव्हते, तर मोदी ज्यांच्या इशाऱ्यावर आंतरराष्ट्रीय राजकारण चालवतात ते अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे बेंजामिन नेतान्याहू होते. स्वतः पंतप्रधानच जर ‘मी बायोलॉजिकल नसून देवाने मला पाठवले आहे’ असे सांगत फिरतात, मग काँग्रेसवर विनाकारण राग कशासाठी काढता?” असा खोचक सवालही हुसेन दलवाई यांनी शेवटी केला. ——————————————————- हेही वाचा… विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात: महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी? पहिला कल कोणाच्या बाजूने? महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या चुरशीच्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली असून, कुणाला धक्का बसणार आणि कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 6 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation Nilesh Chandra Muni Supports Raj Thackeray on Sahyadri Forest Protest 'विकासाला विरोध करणं हाच विरोधकांचा अजेंडा':टोरंट पॉवर प्रकल्पावरून माधुरी मिसाळ यांचे टीकास्त्र; वृक्षतोडीवरून राजकारण तापले