Nail Health | सावधान! नखांवरील ‘हे’ ५ बदल म्हणजे गंभीर आजाराची लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष
Nail Health | आपल्या शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाली की त्याचे संकेत त्वचा, केस आणि नखांमधून दिसू लागतात. अनेक वेळा रक्त तपासणी करण्यापूर्वीच नखांमध्ये होणारे बदल संभाव्य आजारांची सूचना देतात. त्यामुळे नखांकडे फक्त सौंदर्याच्या दृष्टीने न पाहता आरोग्याच्या दृष्टीनेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
नखे शरीरातील पोषक तत्त्वांची स्थिती दर्शवणारा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. नखांवर दिसणारे पांढरे डाग, उभ्या रेषा किंवा आकारातील बदल यामुळे शरीरात लोह, झिंक किंवा व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. (Nail Health News)
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नखांवर लहान पांढरे डाग दिसणे हे ‘ल्यूकोनेकिया’ म्हणून ओळखले जाते आणि हे प्रामुख्याने झिंकच्या कमतरतेशी संबंधित असते. तसेच नखांचा आकार जर चमच्यासारखा आत दबलेला आणि कडेने वर आलेला दिसत असेल, तर शरीरात लोहाची कमतरता किंवा ॲनिमिया असण्याची शक्यता असते. याशिवाय नखे वारंवार तुटणे किंवा कमकुवत होणे हे शरीरात बायोटिन आणि प्रोटीनची पातळी कमी झाल्याचे संकेत देऊ शकते.
Nail Health | इतर आजारांचीही मिळू शकते पूर्वसूचना :
काही वेळा नखांवर लांब किंवा उभ्या रेषा दिसू लागतात. असे झाल्यास शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असण्याची शक्यता असते. त्याचबरोबर शरीरात पाण्याची कमतरता किंवा वाढते वय यामुळेही असे बदल दिसू शकतात. नखांवर दोन समांतर पांढऱ्या रेषा दिसल्यास शरीरातील प्रोटीनची गंभीर कमतरता असल्याचे तज्ज्ञ सांगतात. (Nutrition Deficiency)
याशिवाय नखांचा रंग किंवा स्वरूप बदलल्यास ते इतर आजारांचेही संकेत देऊ शकते. उदाहरणार्थ नखे पिवळी पडल्यास व्हिटॅमिन ईची कमतरता, बुरशीजन्य संसर्ग, थायरॉईड किंवा यकृताशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते. नखांमध्ये वारंवार बुरशीजन्य संसर्ग होत असल्यास ते डायबिटीज (Diabetes) चे लक्षण असू शकते. तसेच नखांवर छोटे खड्डे दिसल्यास सोरायसिस किंवा एलोपेसिया एरिटा यांसारख्या ऑटोइम्युन आजारांची शक्यता असते. नखांवर लालसर रेषा दिसणे हे हृदयाच्या झडपांमध्ये संसर्ग असल्याचे गंभीर संकेत मानले जातात.
