हिंगोलीत इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन:इंदिरा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी
![]()
हिंगोली जिल्हयासह राज्यभरात इंधन पुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी ता. २५ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या समोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हिंगोली येथील इंदिरा गांधी पुतळा परिसरात सकाळी आकरा वाजता आंदोलनास सुरवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, प्रदेश पदाधिकारी महमद जकी कुरेशी, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ, दत्तराव कदम, मिलींद उबाळे, डॉ. निळकंठ गडदे, अतुल नायक, डॉ. साहेबराव देवकते, नंदकुमार पाटील, ॲड. प्रदीप पोले, रवी कोकरे, भगवान खंदारे, शासन कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून पेरणीपुर्व मशागतीचे कामे न झाल्यास पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या शिवाय इंधन मिळत नसल्याने नागरीकांना वाहनाद्वारे प्रवास करणेही कठीण झाले आहे. केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाचे चुकीचे धोरण यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने वाहनांसाठी मुबलक इंधन उपलब्ध करून द्यावे तसेच वाहनांचे आरसी बुक दाखविल्यानंतर कॅन मध्ये इंधन देण्याची मागणी करण्यात आली. तसेच इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी ही करण्यात आली या शिवाय बँकांकडून नाणे टंचाईचे कारण दाखवून पैसे देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प होत असून नागरीकांना स्वतःचे पैसे बँकेतून वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाणे टंचाई दुर करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शासनाने इंधन व नाणे टंचाईचा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सकाळी आकरा वाजता सुरु झालेले ठिय्या आंदोलन दुपारी बारा वाजता मागे घेण्यात आले.
