मेळघाटच्या विकासाला प्राधान्य देणार – सीईओ सत्यम गांधी:म्हणाले – कामात हयगय खपवून घेणार नाही, फिल्ड व्हिजिटवर भर देणार

0
8b64a721-aa9f-4950-98a9-788510038ade_1775492991794.jpg




अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला. कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही, तसेच भ्रष्ट प्रवृत्तीला थारा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली. कार्यालयात बसून काम करण्याऐवजी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्याला आपले प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले. सांगली-मीरज-कुपवाड मनपा आयुक्त म्हणून काम केलेल्या आणि त्यापूर्वी डहाणू सारख्या आदिवासी भागात अनुभव घेतलेल्या सत्यम गांधी यांनी सांगितले की, विकसित भागात विकास कामे करणे सोपे असते, मात्र ग्रामीण भाग विकासापासून दूर असतो. जिल्हा परिषद ही प्रामुख्याने गाव-खेड्यांसाठी काम करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे शासनाने सोपवलेली जबाबदारी आपण चोखपणे पार पाडू. गांधी म्हणाले की, मला कार्यालयात बसण्याऐवजी प्रत्यक्ष गाव-खेड्यात पोहोचून तेथे काय आवश्यक आहे, हे जाणून घेण्यात अधिक रस आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आठवड्यातून किमान दोन दिवस जिल्ह्याचा दौरा करेन. डहाणू सारख्या आदिवासी प्रदेशात काम केल्याचा अनुभव असल्याने मेळघाटच्या अडचणींची मला जाणीव आहे. तेथील मुले-मुली शहरी विद्यार्थ्यांसारखीच तल्लख व्हावीत, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे. विशेषतः, त्या मुलांना इंग्रजी विषयात निपुण करायचे आहे. गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान हे विषयही त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याने त्यावरही विशेष लक्ष देणार आहे. मेळघाटच्या समस्या दूर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून सूत्रे घेतली. त्यानंतर विभागप्रमुखांची ओळख करून घेतली. सुमारे तासभर त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील प्रत्येक विभागाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता केला. आपले व्हिजन काय, या प्रश्नावर गांधी यांनी मेळघाटच्या समस्या दूर करणे हे आपले प्राधान्य असल्याचे सांगितले. मी स्वतः पूर्णवेळ काम करेन आणि इतरांची हयगय खपवून घेणार नाही. फिल्ड व्हिजिटमध्ये कोणते गाव निवडणार, यावर ते म्हणाले की, अद्याप ते ठरले नाही. मंगळवारपासून सर्व विभागांच्या बैठका घेऊन त्यानंतर फिल्ड व्हिजिटचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. डहाणूतील अनुभवाच्या आधारे मेळघाटसाठी नवीन मॉडेल तयार केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed