पत्नीला माहेरी सोडून 4 मुलांना विहिरीत ढकलले:नंतर बापानेही केली आत्महत्या, बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भयंकर घटना

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-25t14_1779700060.png




एका व्यक्तीने पत्नीला माहेरी सोडल्यानंतर 4 मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केल्याची भयंकर घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात घडली आहे. या व्यक्तीने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय मुसा किराडिया असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर त्याने विहिरीत लोटलेल्या मुलांची नावे प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया व पियुष किराडिया अशी आहेत. विजय किराडिया हा भाले अंजन गावचा रहिवासी आहे. विजयचे आपल्या पत्नीशी भांडण झाले होते. त्यानंतर सोमवारी ती घर सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. त्यामुळे विजय आज सकाळी स्वतः घरचे काम करत होता. यावेळी त्याच्या वडिलांनी तू काम का करत आहेस? तुझी बायको कुठे गेली? असा प्रश्न केला. त्यातून झालेल्या वादातून विजय किराडिया यांनी आपल्या चारही मुलांना राजुरा धरण परिसरातील विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली. या भागातील स्थानिक नागरिकांना विहिरीत 5 मृतदेह तरंगताना आढळले. त्यांनी त्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली. त्यानंतर स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढून पुढील सोपस्कारासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवले. एकाच कुटुंबातील 5 जणांचा अशा पद्धतीने अंत झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दारूच्या वादातून वडिलांची हत्या उल्लेखनीय बाब म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. अनिकेत समाधान घायवट (21) असे आरोपीचे नाव आहे. तर समाधान घायवट (44) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दारू पिण्याच्या कारणावरून हे हत्याकांड घडले. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपीने त्यांचा मृतदेह शेतातील लाकडांखाली लपवून ठेवला. त्यानंतर ती लाकडे पेटवून दिली. त्यानंतर पोलिसांत जाऊन वडील 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून अखेर तक्रारदार मुलाची चौकशी केली. त्यात त्याने आपणच वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed