मोर्शीत शिक्षण परिवर्तन यात्रा अंतर्गत प्रेरणादायी कार्यशाळा:पंचायत समिती, शिवाजी हायस्कुलचे संयुक्त आयोजन‎

0
240_177538426069d236c4dbf59_morshishivaji.jpg




प्रतिनिधी | मोर्शी येथील पंचायत समिती कार्यालय व श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील शिक्षकांकरिता शिक्षण परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे यांनी मार्गदर्शन केले. मोर्शीे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम, गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, शाळा निरीक्षक मधुकरराव रोडे, मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड, संदीप बोबडे, विनोद गाडे, मुरलीधरराव डहाणे, शाळा तपासणी अधिकारी निळकंठ यावले, पर्यवेक्षक विठ्ठल नवरे, गजानन चौधरी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जालंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी झेप घेतली व जगातील दहा शाळांमध्ये आपला क्रमांक कसा प्राप्त केला. त्यासाठी त्या शाळेला कोणकोणते बदल करावे लागले याविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बाबळेवाडी व जालिंदर नगर येथील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट करून त्या शाळांना जागतिक दर्जाच्या शाळा बनवल्या. त्यांच्यामते जोपर्यंत पालकांचा सहभाग घेतल्या जात नाही, तोपर्यंत शाळांमध्ये परिवर्तन घडवून आणणे शक्य होत नाही. यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल शिवाजी उच्च माध्यमिक शाळेचा गौरवही करण्यात आला. तसेच तालुक्यामध्ये खाजगी शाळांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त शाळा तसेच जिल्हा परिषद अंतर्गत प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळांचा मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रेमा नवरे यांनी, तर आभार ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed