शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटींची फसवणूक:पुणे येथे सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरू

0
b7b008ae-7e58-4b56-9ad6-41f72240637b_1775468026498.jpg




पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १ कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४५ वर्षीय तक्रारदाराने फिर्याद दिली आहे. तक्रारदार वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्यांना जाळ्यात ओढण्यात आले. चोरट्यांनी तक्रारदाराला समाजमाध्यमातील एका समूहात सहभागी करून घेतले. तक्रारदाराने पैसे गुंतवल्यानंतर, चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले, मात्र प्रत्यक्षात कोणताही परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत. गॅस देयक अद्ययावत करण्याच्या बहाण्याने फसवणूक दरम्यान, गॅस देयक अद्ययावत करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहतात, जिथे पाईपद्वारे गॅस पुरवठा होतो. चोरट्यांनी गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याची माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी खात्यातून सहा लाख रुपये काढून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed