विदर्भाच्या राजकारणात मोठी खळबळ:विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सुरुंग?; 60 हून अधिक काँग्रेस नगरसेवक 'नॉट रिचेबल'
![]()
महाराष्ट्रात १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे गणित अद्याप सुटलेले नसतानाच, पूर्व विदर्भात अत्यंत खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. अधिकृत उमेदवारांची नावे निश्चित होण्यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची पळवापळवी सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि महत्त्वाच्या नगरसेवकांचे फोन अचानक बंद झाले असून, ते ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एवढेच नव्हे तर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल ६० हून अधिक नगरसेवक एकाच वेळी गायब झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधान परिषदेची ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींमधून (जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक) होणार असल्याने, महापालिकेतील आणि नगरपंचायतींमधील प्रत्येक मताला मोल प्राप्त झाले आहे. अशातच भाजपने काँग्रेसला गाफील ठेवून पूर्व विदर्भात मोठी रणनीती आखल्याची माहिती मिळत आहे. लोकप्रतिनिधी आमदार बंटी भांगडियांच्या संपर्कात? हे सर्व लोकप्रतिनिधी भाजपचे चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या थेट संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपने या सर्व नगरसेवकांना मत फुटू नये म्हणून तातडीने राज्याबाहेर किंवा अज्ञात स्थळी सुरक्षित हलवल्याचे बोलले जात आहे. केवळ सिंदेवाहीच नव्हे तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल ६० पेक्षा जास्त नगरसेवक अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहेत. या मोठ्या खिंडारामुळे काँग्रेस छावणीत प्रचंड अस्वस्थता पसरली असून नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर होण्याआधीच तटबंदी; वडेट्टीवारांना मोठा धक्का राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागेवर कोण लढणार, याच्या प्राथमिक बैठका सुरू आहेत. अद्याप कोणत्याही पक्षाने चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मात्र, प्रत्यक्ष रणसंग्राम सुरू होण्यापूर्वीच भाजपने मतदारांची तटबंदी करत विरोधी पक्षांची ताकद तोडण्यास सुरुवात केली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या स्वतःच्या हक्काच्या बालेकिल्ल्यातच भाजपने ही मोठी गुप्त मोहीम फत्ते केल्यामुळे, हा वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाला आणि पर्यायाने काँग्रेसला लागलेला मोठा धक्का मानला जात आहे. विदर्भातील निवडणूक चुरशीसी होणार! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार आणि नगरसेवकांची पळवापळवी नवीन नसली, तरी थेट विरोधी पक्षनेत्यांच्याच घरात घुसून भाजपने खेळलेली ही ‘किंगमेकर’ खेळी सर्वांनाच चकित करणारी ठरली आहे. काँग्रेसचे गायब झालेले नगरसेवक आता थेट मतदानाच्या वेळीच समोर येणार की काँग्रेस डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होणार, यावर या जागेचे भवितव्य अवलंबून आहे. या नाट्यमय घडामोडींमुळे पूर्व विदर्भातील विधान परिषदेची ही लढाई अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार, हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.
