क्रेडिट कार्ड अपडेट करण्याचा बहाणा:तरुणीची सायबर चोरट्यांनी केली तीन लाखांची फसवणूक, खडकीत गुन्हा दाखल

0
68063f54-6ee1-4cb9-977c-6e8023d93fa9_1775470018366.jpg




क्रेडिट कार्डची माहिती अद्ययावत करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी खडकी परिसरातील एका तरुणीची २ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तरुणीने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करत, क्रेडिट कार्डची माहिती अद्ययावत न केल्यास कार्ड बंद होईल, अशी भीती दाखवली. यानंतर त्यांनी तरुणीच्या बँक खात्याची माहिती मिळवली आणि त्याचा गैरवापर करून खात्यातून पैसे काढून घेतले. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक दरम्यान, ऑनलाइन टास्कच्या आमिषाने आणखी एका तरुणाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्ता भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी २ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणाला सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संदेश पाठवून घरातून ऑनलाइन काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला एक छोटे काम देऊन त्याचे पैसे खात्यात जमा केल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्षात पैसे जमा झाले नव्हते. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाला पैसे गुंतवण्यास सांगितले. यानंतर तरुणाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात २ लाख ७१ हजार रुपये जमा केले. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या पैशाच्या अनुषंगाने परतावा मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली. मात्र ,आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत कोणताही परतावा देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed