ऑनलाइन अपॉइंटमेंट घेताना महिलेची ५.५४ लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांनी डॉक्टरांच्या नावाने केली फसवणूक, डेक्कन पोलिसांत गुन्हा

0
bcb88b37-6703-455c-9c9a-e9ea28a8387b_1775469605990.jpg




पुण्यात डॉक्टरांची ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याच्या प्रयत्नात एका ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी ५ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. सायनसच्या उपचारासाठी माहिती शोधत असताना ही घटना घडली असून, डेक्कन पोलिसांनी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ज्येष्ठ महिला विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. त्यांना मागील अनेक दिवसांपासून सायनसचा त्रास असल्याने त्यांनी मोबाइलवर या विकारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती शोधली. त्यावेळी त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. डॉक्टरांना तात्काळ भेटून तातडीने औषध उपचार करून घ्यावेत असे त्यांनी ठरवले. त्यानुसार डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, तो क्रमांक डॉक्टरांचा नसून सायबर चोरट्यांनी तो ऑनलाइन टाकला होता. चोरट्यांनी अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी सुरुवातीला महिलेला ५ रुपये ऑनलाइन पाठवण्यास सांगितले. महिलेने ते पैसे चोरट्यांच्या खात्यात जमा केले. यावेळी चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला, कारण तो क्रमांक तिच्या बँक खात्याशी जोडलेला होता. त्यानंतर, चोरट्यांनी परस्पर महिलेच्या बँक खात्यातून ५ लाख ५४ हजार रुपये स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केले. चोरट्यांनी महिलेचे बँक खाते रिकामे करण्यास सुरुवात केल्याने याबाबत महिलेच्या कुटुंबियांना संशय आल्यावर त्यांनी चौकशी केली असता, चोरट्याने मोबाइल क्रमांक बंद केल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed